दैनिक स्थैर्य | दि. १३ नोव्हेंबर २०२४ | फलटण | ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या फलटण तालुक्यात विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मतदान करुन नवा इतिहास घडवा असे आवाहन सातारा जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी व स्वीप जिल्हा नोडल अधिकारी याशनी नागराजन यांनी केले आहे.
येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात सुमारे १ हजार विद्यार्थी/विद्यार्थिनी, शिक्षक/शिक्षिका, मतदार यांच्या सहभागाने महाराष्ट्राचा नकाशा व मानवी साखळी साकारण्यात आली, त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन बोलत होत्या, यावेळी आयोजन करण्यात आले होते यावेळी सातारा जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार फलटण डॉ. अभिजीत जाधव, प्रभारी गटविकास अधिकारी कुंभार, निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा नगर परिषद मुख्याधिकारी निखिल मोरे व त्यांचे सहकारी अधिकारी, स्वीप नोडल अधिकारी तथा कृषी सहाय्यक सचिन जाधव, यशवंतराव चव्हाण हायस्कूलसह शहरातील विविध शाळांमधील प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक/शिक्षिका, शहरवासीय नागरिक उपस्थित होते.
याशनी नागराजन यांनी उपस्थित मतदार, शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधून घरी आपल्या आई – बाबा, कुटुंबीय, परिसरातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन केले.
फलटणचा अभिमान बाळगून, लोकशाही बळकट करण्यासाठी १०० % मतदान करण्याचे आवाहन करताना दि. २० नोव्हेंबर रोजी प्रत्येक मतदार बंधू – भगिनी यांनी घराबाहेर पडून मतदान करावे असे आवाहन सातारा जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांनी केले.
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार फलटण डॉ. अभिजित जाधव यांनी स्वीप अंतर्गत राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे गत लोकसभा निवडणूकित मतदानाचा टक्का वाढल्याचे निदर्शनास आणून देत यावेळी तो अधिक वाढेल असा विश्वास व्यक्त करताना या सर्व उपक्रमांमध्ये प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षक/शिक्षिका, विद्यार्थी/विद्यार्थिनी यांचा सहभाग अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे निदर्शनास आणून दिले.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली, मतदान जनजागृती साठी पथनाट्य, मतदार राजा जागा हो हे लोकगीत सादर करण्यात आले, तर काही विद्यार्थी/विद्यार्थिनी यांनी आपल्या मनोगतातून मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याचे सांगत त्यासाठी सर्व पात्र मतदारांनी मतदान करुन योग्य लोकप्रतिनिधी निवडण्याची आवश्यकता उपस्थितांना समजावून सांगितली.
प्रारंभी स्वीप नोडल अधिकारी तथा कृषी सहाय्यक सचिन जाधव यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात स्वीप अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाविषयी माहिती देत शाळा, महाविद्यालय, बस स्थानक, ग्रामीण भागातील आठवडी बाजार, शेताच्या बांधावर, दूध संकलन केंद्रावर, मंदिरात जेथे गर्दी असेल तेथे स्वीप अंतर्गत उपक्रम राबवून विविध समाज घटकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत असल्याचे निदर्शनास आणून दिले.
प्रा. रविंद्र कोकरे यांनी सूत्र संचालन व समारोप केला, त्यापूर्वी उपस्थितांना मतदान करण्याबाबत शपथ देण्यात आली.