स्थैर्य, १ : आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणममध्ये एका भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. विशाखापट्टणममधील हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडमध्ये एक क्रेन पडल्यामुळे हा अपघात झाला.
विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी विनय चंद यांनी या प्रकरणी 11 लोकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पर्यटनमंत्री एम श्रीनिवास राव यांनी स्थानिक प्रशासनासोबत याबद्दल चर्चा केली आहे.
राव यांनी म्हटलं, की त्यांची या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली असून जिल्हा प्रशासनानं एक टीम घटनास्थळी पाठवली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून निवेदन
आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयानं या प्रकरणी ट्वीट केलं आहे. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी विशाखापट्टणम जिल्हाधिकारी आणि शहराचे पोलिस आयुक्त यांना यासंदर्भात तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी विनय चंद यांनी म्हटलं, की नवीन क्रेनची ट्रायल रन सुरू असताना हा अपघात झाला. याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश आम्ही हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडला दिले आहेत. त्याचप्रमाणे स्थानिक प्रशासनालाही उच्चस्तरीय समिती स्थापन करून या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हिंदुस्तान शिपयार्डमध्ये काम करणाऱ्या अनेक कामगारांचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले असून स्थानिक पोलिस आणि कंपनी व्यवस्थापनाकडून कोणतीही माहिती देण्यात येत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.