
स्थैर्य, 23 फेब्रुवारी, सातारा : सातारा नगरपालिकेच्या माजी नगरसेविका व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या कॉ अंजलीताई महाबळेश्वरकर (89) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्या नुकत्याच पुणे येथे त्यांची कन्या गौरी देशपांडे महाबळेश्वरकर यांच्याकडे राहायला गेल्या होत्या. माकप चे ज्येष्ठ नेते कॉ प्रभाकर महाबळेश्वरकर यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांच्या पार्थिवावर सातारा येथे आज सकाळी कैलास स्मशानभूमी संगम माहुली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी मरणोत्तर नेत्रदान केले होते. संगम माहुली येथे कॉम्रेड अंजलीताई महाबळेश्वर को लाल सलाम अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता..
यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते, माजी नगराध्यक्ष डॉ.अच्युत गोडबोले, नगरसेवक शंकर माळवदे व इतर अनेकांनी अंत्यदर्शन घेतले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते अशोक ढवळे यांनी शोक संदेश पाठवला.
संगम माऊली येथे झालेल्या शोभसभेत असलम तडसरकर, शिवाजी राऊत, विजय निकम, विजय देशपांडे, सर्जेराव भुजबळ, गणेश देशमुख, माणिक अवघडे, विजय मांडके आदींनी कॉ. अंजलीताइंंविषयीच्या आठवणींना उजाळा दिला.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व जनवादी महिला संघटनेला गेल्या महिन्यातच त्यांनी प्रत्येकी एक एक लाख रुपये देणगी दिली होती. नगरपरिषदेच्या त्यावेळच्या राजकारणात त्या एकमेव विरोधी पक्षनेत्या होत्या. कॉ. अंजलीताईं जनवादी महिला संघटना, अंगणवाडी कर्मचारी संघटना, घरेलू कामगार संघटना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्याशी नेहमीच सक्रिय राहिल्या होत्या.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात, मरियम बूटवाला ढवळे, अशोक ढवळे यांनी नुकतीच भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती.

