दैनिक स्थैर्य | दि. २१ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त, कृषी महाविद्यालय फलटण येथील अंतिम वर्षातील विद्यार्थिनींनी ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२४ कार्यक्रमांतर्गत पिंपरद येथील शेतकर्यांना गुरे आणि गोठ्याची स्वच्छता व निर्जंतुकीकरण याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
यावेळी पिंपरद गावच्या सरपंच सौ. स्वाती भगत, उपसरपंच श्री. सागर बोराटे यांचे कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले. यावेळी २० शेतकरी उपस्थित होते. त्यांना कृषीकन्यांनी गुरे आणि गोठ्याची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण याची माहिती सांगितली.
कृषीकन्यांनी स्वच्छतेमुळे जनावरांची त्वचा स्वच्छ होते, रक्ताभिसरणात वाढ होते, जनावर निरोगी राहण्यास मदत होते, जनावरांमध्ये लाळखुरकूत, देवी व इतर संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव झाला असल्यास त्यावर वेळीच नियंत्रण मिळवता येते व उत्पादकता वाढते, यासाठी गुरे आणि गोठ्याची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण आवश्यक आहे, याचे महत्त्व शेतकर्यांना पटवून दिले.
कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे मॅडम तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्या कु. प्रतीक्षा जगताप, अक्षदा जाधव, समृद्धी जगताप, आरती जाधव, प्रणिता गोडसे, निशिगंधा खुडे, आर्या जाधव यांनी हे प्रात्यक्षिक यशस्वीरित्या पार पाडले.