गायीच्या दुधाला सरसकट अनुदान द्यावे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


भाजप महायुतीचे सातार्‍यात आंदोलन : जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

स्थैर्य, सातारा, दि. 20 : गायीच्या दुधाला सरसकट 10 रुपये प्रतिलिटर अनुदान व दुध पावडरला प्रती किलो 50 रु. अनुदान द्यावे, अशी मागणी करत भाजप व महायुतीच्या वतीने सोमवारी संपूर्ण राज्यात आंदोलन करण्यात आले. सातारा येथे आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी निवासी जिल्हाधिकारी थोरवे आणि तहसीलदार सातारा आशा होळकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील शेतकर्‍यांच्या संकटामध्ये दिवसेदिवस भर पडत आहे. बँकेकडून नाकारला जाणारा कर्ज पुरवठा, नकली सोयाबीन बियाणामुळे करावी लागलेली दुबार पेरणी, युरिया खताचा तुटवडा व काळा बाजार, कोकणातील शेतकर्‍यांचे वादळामुळे झालेले नुकसान, अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकाचे झालेले नुकसान या विविध संकटामध्ये शासनाकडून शेतकर्‍यांना कोणताही दिलासा प्राप्त झाला नाही. या संकटातच दुधाचे भावही कमी झाल्याने दुध उत्पादक शेतकर्‍यांची अवस्था दयनीय झाली आहे.

महाराष्ट्रामध्ये 1 कोटी 40 लाख लिटर गायीचे दुध उत्पादित होते. त्यापैकी 35 लाख लिटर सहकारी संघाकडून खरेदी केले जाते. 90 लाख लिटर दुध खाजगी संस्था व डेअरीच्या माध्यमातून विकत घेतले जाते. 15 लाख लिटर दूध शेतकरी स्वत: हॉटेल्स, ग्राहक यांना पुरवतो. शासकीय योजनेद्वारे फक्त 1 लाख लिटर दुध खरेदी केले जाते.

या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात दुधाचा विक्रीमध्ये 30 टक्केपर्यंत घट झाली. शहरातील हॉटेल्स, चहाची दुकाने बंद असल्यामुळे दुधाची मागणी घटली. आजच्या घडीला खाजगी संस्था व सहकारी दुध संघाकडून दूध 15 ते 16 रु. दराने खरेदी केले जात आहे. त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्च सुद्धा निघू शकत नाही. शासनाने 10 लाख लिटर दुध 25 रु. प्रती लिटर या भावाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. परंतु, प्रत्यक्षात 7 लाख लिटर दुध खरेदी केले जात आहे. मंत्र्याचे लागेबांधे असलेल्या दुध संघाकडून शासन दुध विकत घेत आहे. इतर शेतकर्‍यांना व दुध उत्पादकांना शासनाने वार्‍यावर सोडले आहे.

तसेच ,गायीच्या दुधाला प्रती लिटर 10 रु. अनुदान, दुध भुकटी करिता प्रती किलो 50 रु अनुदान, शासनाकडून 30 रु. प्रती लिटरने दुधाची खरेदी या न्याय्य मागण्याकरिता सर्व शेतकरी 1 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दुध एल्गार आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हणले आहे.

या निवेदनाची प्रत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री ना. सुनील केदार मंत्री, क्रिडा व युवक, महाराष्ट्र राज्य,यांना माहिती आणि कार्यवाही साठी पाठवण्यात आली आहे.

यावेळी भाजपा प्रदेश कार्यकरिणी सदस्य अमित कुलकर्णी, सातारा शहराध्यक्ष आणि नगरसेवक विकास गोसावी, सातारा ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र इंगळे, सातारा शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, विट्ठल बलशेटवार, ग्रामीणचे सरचिटणीस गणेश पालखे, नगरसेवक धनंजय जांभळे, नगरसेवक विजय काटवटे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश नलावडे, सातारा शहर अध्यक्ष विक्रम बोराटे, ग्रामीण युवा मोर्चा उपाध्यक्ष तेजस काकडे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!