दैनिक स्थैर्य | दि. ४ मार्च २०२४ | फलटण |
कोरेगाव तालुक्यातील करंजखोप येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न, फलटण एज्युकेशन सोसायटीअंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीकन्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२०२४ कार्यक्रमाअंतर्गत स्वच्छता करून गायीचे दूध काढण्याचे प्रात्यक्षिक शेतकर्यांना दिले.
कृषीदूत दुधाळ सौरभ, शिवरूप मिंड, लोखंडे सुप्रीत, बेलदार शुभम, ढोबळे सुमित, दोडमिसे शुभम यांनी स्वच्छतेचा अवलंब करून गायीचे दूध काढण्याचे प्रात्यक्षिक दिले. त्याअंतर्गत त्यांनी गायीची धार काढण्यापूर्वी स्वच्छतेसंबंधी घ्यावयाची काळजी सविस्तर शेतकर्यांना सांगितली. या माहितीअंतर्गत त्यांनी गायीची धार काढण्यापूर्वी गायीचा कासेचा भाग स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा, गायीचा पाठीमागचा भाग की जो मलमूत्राने भरतो, तो धार काढण्यापूर्वी पाण्याने स्वच्छ धुवून हाताने धार काढण्यासाठी जे पात्र वापरतो, तेही स्वच्छ असावे, जर मशीनने धार काढत असाल तर मशीन वापरण्यापूर्वी स्वच्छ धुवावी, असे सांगितले. या माहितीचे कृषीदूतांनी प्रात्यक्षिक शेतकर्यांना दाखवले. शेतकर्यांनी या प्रात्यक्षिकास मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला.