कोव्हीशिल्ड या कोरोना प्रतिबंधक लसीमधील कालावधी वाढवला; आता 84 दिवसांनी मिळणार दुसरा डोस : गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे – पवार


स्थैर्य, फलटण, दि. १४: सध्या फलटण तालुक्यात कोरोनाने थैमान घातलेले आहे. कोरोनाला दोन हात करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगाने होणे गरजेचे आहे. सध्या फलटण तालुक्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या माध्यमातून कोव्हीशिल्ड या कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे. आता नव्याने पारित झालेल्या शासन निर्णयानुसार आता कोव्हीशिल्ड या लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस हा 84 दिवसांनी दिला जाणार आहे. कोव्हीशिल्ड लसीबाबत असलेल्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेमध्ये सुद्धा आवश्यक ते बदल केले जाणार आहेत, अशी माहिती फलटण पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे – पवार यांनी दिली.

कोव्हीशिल्ड या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची नोंदणी करताना आता पहिल्या डोस नंतर 84 दिवसांनी दुसऱ्या डोसची नोंदणी होईल. त्या आधी नोंदणी होणार नाही. ज्यांनी ह्या पूर्वीच दुसऱ्या डोस साठी नोंदणी केलेली असेल त्यांची नोंदणी रद्द होणार नाही. परंतु त्यांना आरोग्य विभागाच्या वतीने आपली नोंदणी पुढे पुन्हा करण्यात यावी असा सल्ला देण्यात येणार आहे, अशीही माहिती डॉ. सौ. अमिता गावडे – पवार यांनी दिली

वर्किंग ग्रुपनं केलेल्या शिफारसी सरकारनं मान्य केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं यासंदर्भातील आदेश पारित केलेले आहेत. दरम्यान, कोवॅक्सिन या लसीच्या दुसऱ्या डोसचा कालावधी मात्र वाढवण्यात आला नाही. ब्रिटनमध्ये उपलब्ध रियल लाईफ एविडन्सच्या आधारे वर्किंग ग्रुपनं कोविशिल्ड या लसीच्या दोन डोसमध्ये १२ ते १६ आठवड्यांचं अंतर ठेवण्याची शिफारस केली होती. ती सरकारनं मंजूर केली आहे. परंतु कोवॅक्सिनबाबत कोणतीही शिफारस करण्यात आलेली नव्हती.

केंद्र सरकारची कोरोना सल्लागार समितीने सीरम इन्स्टिट्यूट बनवत असलेली ऑक्सफर्डच्या कोविशिल्डचा दुसरा डोस देण्याचा कालावधी वाढविण्याची शिफारस केली होती. कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवड्यांनी वाढविण्यास सांगण्यात आलं होतं. पूर्वी कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर हे चार ते आठ आठवड्यांचं होतं. महत्त्वाचं म्हणजे भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसचा कालावधी तसाच ठेवण्यात आला आहे. तो चार आठवड्यांचा आहे. ज्यांना कोरोनाची लागण झाली होती आणि जे बरे झाले आहेत त्यांनी देखील लगेचच कोरोना लस घेण्यासाठी धावाधाव करण्याची गरज नसल्याचे या वर्किंग ग्रुपनं म्हटलं आहे. अशा लोकांनी बरं झाल्यापासून सहा महिन्यांनी लस घ्यावी, असेही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलेले आहे.


Back to top button
Don`t copy text!