‘कोविडमुक्त गाव’ अभियान पुणे विभागातही राबवावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२२ जानेवारी २०२२ । पुणे । पुणे जिल्हा परिषद आणि भारतीय जैन संघटनेने जिल्ह्यात यशस्वीपणे राबविलेले कोविडमुक्त गाव अभियान उपयुक्त असून पुणे विभागातही याची अंमलबजावणी करावी आणि अभियानाच्या माध्यमातून आपले गाव कोविडमुक्त करण्यासाठी ग्रामस्थांनीदेखील यात सहभाग घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा परिषद आणि भारतीय जैन संघटनेतर्फे राबविण्यात येणाऱ्या कोविडमुक्त गाव अभियानाच्या जिल्हास्तरीय उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कोविडच्या पार्श्वभूमीवर आभासी (ऑनलाइन) पद्धतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला जि. प. अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, बिजेएसचे शांतीलाल मुथा आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्ह्यातील सरपंचांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. ते म्हणाले, मागील दोन वर्षांपासून आपण कोविड संकटाशी मुकाबला करीत आहोत. हे मानवजातीवर आलेले संकट असल्याने सर्वांनी मिळून ही लढाई लढावी लागेल. नागरिकांनाही या आजाराबाबत गांभीर्य लक्षात आले आहे. दोन वर्षात विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान झाले आहे. हे संकट टाळण्यासाठी ग्रामविकास विभागाच्यावतीने कोविडमुक्त गाव करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. बिजेएसच्या सहकार्याने पुण्यातील काही गावात राबविलेला हा उपक्रम यशस्वी ठरल्याने तो  राज्यस्तरावर राबविण्याबाबत मंत्रिमंडळातील इतर सदस्यांना कार्यक्रमाची माहिती देण्यात येईल.

कोणताही उपक्रम वैयक्तिक प्रयत्नाने यशस्वी होत नाही, त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असते. ग्रामीण भारताचे सूत्र युवकांच्या हाती जात असून त्यात महिलांची संख्याही लक्षणीय आहे. महिलांनी आणि युवकांनी निश्चय केल्यास गाव कोविडमुक्त होऊ शकेल, असा विश्वास त्यानी व्यक्त केला. कोविडमुक्त 44 गावातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांचे त्यांनी अभिनंदन केले आणि जिल्ह्यातील नागरिकांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले.

प्रास्ताविकात श्री. मुथा यांनी मोहिमेची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. ते म्हणाले, जिल्ह्यातील 550 गावांनी गाव कोविडमुक्त करण्यासाठी कृतीदलाची स्थापना केली असून त्यांना बिजेएसतर्फे ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व गावात ही मोहीम राबविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!