कोरोनाबाधित रूग्णांची हेळसांड झालेली खपवुन घेणार नाही; आमदार दीपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजेंची प्रशासनाला तंबी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. १६ : सध्या फलटणमध्ये कोरोना रुग्णांची संख्याही चांगलीच वाढायला लागलेली आहे. तरी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना त्यांच्या आरोग्याची हेळसांड झालेली खपून घेणार नाही, अशी तंबी फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी प्रशासनाला दिली.

फलटण येथील शासकीय विश्रामगृहामध्ये कोरोना आढावा बैठक ही आमदार दीपक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आलेली होती. यावेळी आमदार दीपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप, पोलीस उपाधीक्षक तानाजी बरडे, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. व्यंकट धवन, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी सौ. अमिता गावडे, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, नितीन सावंत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रांत पोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपजिल्हा रुग्णालयाचे कामकाज सुधारा : आमदार दीपक चव्हाण

फलटणमध्ये असणार्या उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या रूग्णांवर तातडीने उपचार केले जात नाहीत, उपजिल्हा रुग्णालयातील व्हेंटिलेटरवर बंद आहेत, ऑक्सीजन जोडण्यासाठी कर्मचारी ट्रेन नाहीत या व अश्या बर्याच तक्रारी ह्या उपजिल्हा रुग्णालयाच्या बाबतीत कायम येत आहेत. तरी उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने तातडीने कामकाज सुधारावे. व्हेंटिलेटरवर व इतर काही नादुरुस्त असतील तर त्या बाबतचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकांकडे पाठवावा. रिक्त पदांच्या भरतीची मागणी सुध्दा करण्यात यावी. कोरोनाबाधित रूग्णांची कोणत्याही प्रकारे हेळसांड होणार नाही, यांची दक्षता घ्यावी व उपजिल्हा रुग्णालयाचे कामकाज सुधारावे, असे आवाहन आमदार दीपक चव्हाण यांनी यावेळी केले.

भाजीमंडई व किराणा मालाच्या दुकानांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न करा : श्रीमंत संजीवराजे

सध्या फलटण शहरामध्ये व उपनगरात भाजीमंडई व किराणा मालाच्या दुकानात नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे, तरी तेथे होणारी गर्दी टाळण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील त्या कराव्यात. गरज पडली तर कठोर निर्बंध लादले तरी चालतील, अशा सुचना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिल्या.

ऑक्सीजनचा सप्लाय कमी पडू देवू नका : श्रीमंत संजीवराजे

फलटणमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आगामी काही दिवसांमध्ये ऑक्सिजनचे बेड शिल्लक असणेही गरजेचे आहे. तरी ऑक्सिजन पुरवठादारांनी ऑक्सिजनचा पुरवठा हा फलटणमध्ये कसा जास्तीत जास्त प्रकारे होईल. फलटण तालुक्यात साठी लागणारा ऑक्सिजनचा सप्लाय कमी पडू देऊ नका, अशा सूचना यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी ऑक्सिजन सप्लाय कंपनीचे अधिकारी मनिष कुमार यांना दिल्या.

खाजगी दवाखान्यांचे दरआकारणी बाबत पडताळणी करणार : प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप

फलटण शहरांमध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी खाजगी दवाखान्याला परवानगी देण्यात आलेली आहे. परंतु काही ठिकाणांहून अशी तक्रार येत आहे की, खाजगी दवाखान्यांमध्ये शासनाच्या नियमापेक्षा जास्त दर आकारले जात आहेत. याबाबत लवकरच खाजगी दवाखान्यांना भेटी देऊन दरांबाबत पडताळणी करणार असल्याची माहिती प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी आमदार दीपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांना दिली.

शहरासह तालुक्यात विनाकारण फिरणाऱ्यांना पोलीसी खाक्या दाखवणार : पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे

फलटण शहरासह तालुक्यामध्ये विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची संख्या मोठ्याप्रमाणात दिसून येत आहे. तरी आगामी काळामध्ये जर कोणीही अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडले, तर त्यांना पोलिसी खाक्या दाखवून त्यांचा बंदोबस्त करणार असल्याची माहिती फलटणचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी आमदार दीपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांना दिली.

संपुर्ण तालुक्यात लसीकरण मोहीम वाढवा : श्रीमंत संजीवराजे

सध्या कोरोना रोगाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत चाललेला आहे. अश्या मध्ये कोरोनावर आळा घालण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय प्रामुख्याने समोर दिसत आहे. तरी कोरोना प्रतिबंधक लसीकरण संपुर्ण तालुक्यात कश्याप्रकारे जास्तीत जास्त करता येईल. या कडे लक्ष देणे आवश्यक आहे. सध्या फलटण तालुक्यात लसीकरण करण्यासाठी लस ह्या पुरेश्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीत, अशी माहिती गट विकास अधिकारी डॉ. अमिता गावडे – पवार यांनी दिल्यानंतर आगामी काळामध्ये फलटण तालुक्याला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लस उपलब्ध होतील, अशी ग्वाही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी घेतली फलटण तालुक्यातील कोरोनाची माहिती

विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यातील कोरोना रोगाची माहिती कोरोना आढावा मिटिंगमध्ये दुरध्वनी द्वारे घेतली व फलटणमध्ये कोरोनाला आळा घालण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण करण्यात यावे, अशा सुचना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिल्या.


Back to top button
Don`t copy text!