स्थैर्य, पांचगणी, दि. २९ : महाबळेश्वर तालुक्यातील कोविड रुग्णांसाठी बेल एअरमध्ये पाहिले कोविड आय सी यू सेंटर झाल्याने हे सेंटर तालुक्यातील कोविड रुग्णांसाठी संजीवनी ठरणार असल्याचे प्रतिपादन वाईच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर यांनी केले.
पाचगणी, ता. महाबळेश्वर येथील बेल एअर हॉस्पिटलमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या कोविड आयसीयू सेंटरचे आज उद्घाटन झाले. यावेळी प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर बोलत होत्या.
यावेळी तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील, बेल एअरचे संचालक फादर टॉमी, डॉ. विराज वासुदेव, डॉ. अरुणा रसाळ, डॉ. विठ्ठल बाबर, डॉ. शीतल दाभोळे, व्यवस्थापक जतिन जोसेफ आदी मान्यवर उपस्थित होते.
तहसीलदार सुषमा पाटील म्हणाल्या, महाबळेश्वर तालुक्यात जिल्ह्यातील सर्वात कमी रुग्ण आहेत. डोंगराळ व दुर्गम असूनही आपण तालुक्यातील 75 टक्के गावे कोरोनापासून मुक्त ठेवली आहेत. हे आपल्या प्रशासनाचे यश म्हणावे लागेल. पाचगणीमधील हे सेंटर तालुक्याच्या कोरोना रुग्णांचा आधार ठरणार आहे.
फादर टॉमी म्हणाले, सध्या कोरोना संक्रमणाचा वाढता काळ असून महाबळेश्वर तालुक्यात सुसज्ज कोविड हॉस्पिटल असणे गरजेचे होते. ही गरज ओळखून आम्ही इतर शहरांपेक्षा शासनमान्य दरात या कोविड सेंटरसाठी आग्रही होतो. त्याला आज यश आले आहे. जतिन जोसेफ म्हणाले, महाबळेश्वर तालुक्यातील हे पहिले अत्यावश्यक सोयींनीयुक्त असे कोविड सेंटर असून येथे 3 व्हेंटिलेटर, 16 ऑक्सिजन बेड, वाई व सातार्याप्रमाणे इंजेक्शन कमी किमतीत आपण देणार आहोत. मोबाईल एक्सरे युनिट, मॉनिटर अशा आधुनिक यंत्रणेने हे आय सी यू सेंटर रुग्णांच्या सेवेसाठी आम्ही सज्ज ठेवले आहे. संदीप बाबर यांनी आभार मानले.