महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतली माता व बाळाची भेट; डॉक्टर, पारिचारिका व कर्मचाऱ्यांचे मानले आभार
स्थैर्य, अमरावती, दि. 22 : येथील जिल्हा कोविड रूग्णालयात दाखल कोरोना पॉझिटिव्ह महिलेने सोमवारी (15 जून) एका गोंडस मुलीला जन्म दिला. कोविड रुग्णालयाच्या डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांच्या चमूने रुग्णालयात या महिलेची सुरक्षित प्रसूती केली. आई व बाळ दोघेही सुखरूप असल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी यावेळी स्वत: उपस्थित राहून महिलेला शुभेच्छा देत बाळाला आशीर्वाद दिला.
अमरावतीतील सिध्दार्थनगर येथील रहिवासी असलेल्या गर्भवती महिलेला (20) त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रविवारी (14 जून) रोजी कोविड रुग्णालयात ॲडमिट करण्यात आले होते. कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे शहरातील इतर खासगी रुग्णालयांनी सदर महिलेला दाखल करुन घेण्यासाठी नकार दिला होता. या महिलेला आरोग्य विभागाच्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उभारण्यात आलेल्या जिल्हा कोविड रुग्णालयात सदर महिलेला ॲडमिट करुन घेण्यात आले. डॉक्टर व चमूने अथक परिश्रम घेऊन महिलेची दुसऱ्या दिवशी सुरक्षित प्रसुती करण्यात आली. सदर महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला आहे.
बाळ व माता दोघेही सुदृढ स्थितीत असून आज रोजी त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यानिमित्त पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज त्यांची रुग्णालयात प्रत्यक्ष जाऊन सदर माता व बाळाची भेट घेतली. यावेळी पालकमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन सदर महिलेचे अभिनंदन केले, तसेच नवजात चिमुकलीलाही हातात घेऊन तिचे कौतुक केले.
कोरोना संकटकाळात जिल्हा कोविड रूग्णालयातील पथक अथक परिश्रम घेत कामे करत आहेत. या काळात आरोग्य यंत्रणेच्या दृष्टीने निर्माण होणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करण्यात येत आहे. गर्भवती भगिनीवर उपचार सुरु असताना त्यांच्या आरोग्य सुधारणेची काळजी घेत यशस्वीपणे प्रसुती करण्यात आली. प्रसुतीसाठी जिल्हा कोविड रूग्णालयात तत्काळ प्रसूती कक्षाची व्यवस्था करण्यात आली. प्रसुती तज्ज्ञांसह पीपीई कीट व इतर साधनसामग्री सुसज्ज ठेवण्यात आली. दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेने बाळाला जन्म दिला. कोरोना रुग्णालयात उपचारानंतर बाळ व महिलेला आज सुखरूपपणे घरी परतता आले आहे. या घटनेबद्दल आनंद व्यक्त करत पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी स्वत: रुग्णालयाला भेट देऊन आई व बाळाचे कौतुक केले.