दैनिक स्थैर्य । दि.०२ फेब्रुवारी २०२२ । मुंबई । मुंबईत १ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रगीताचा अवमान केल्याबद्धल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मुंबई भाजपचे सचिव अॅड विवेकानंद गुप्ता यांनी केलेल्या तक्रारी वरुन मुंबई महानगर दंडाधिकाऱ्यांनी समन्स बजावले असून २ मार्च २०२२ रोजी न्यायालयासमोर उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
१ डिसेंबर २०२१ रोजी यशवंतराव प्रतिष्ठान येथे प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला श्रीमती ममता बॅनर्जी, अख्तर यांच्या समवेत व्यासपीठावर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अखेरीला राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर श्रीमती बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताच्या सुरुवातीच्या दोन ओळी बसून म्हंटल्या नंतरच्या दोन ओळी उभे राहून म्हंटल्या आणि राष्ट्रगीत सुरू असतानाच त्या तिथून निघून गेल्या. राष्ट्रगीता संबंधातील कायद्याचा श्रीमती बॅनर्जी यांनी भंग केला असून या बद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करणारा अर्ज गुप्ता यांनी महानगर दंडाधिकाऱ्यांपूढे दाखल केला होता. या अर्जासोबत त्यांनी त्या कार्यक्रमाची ध्वनिचित्रफित सादर केली होती. महानगर दंडाधिकाऱ्यांनी ही चित्रफित पाहिल्यानंतर श्रीमती बॅनर्जी यांना २ मार्च २०२२ रोजी न्यायालयापुढे उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. श्रीमती बॅनर्जी या शासकीय कार्यक्रमासाठी उपस्थित नसल्यामुळे त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यास कसलीही परवानगी लागत नाही. त्यामुळे त्यांना न्यायालयापुढे हजर राहावे लागेल असे महानगर दंडाधिकारी पी. आय. मोकाशी यांनी आपल्या आदेशात म्हंटले आहे.
या कार्यक्रमाला श्रीमती ममता बॅनर्जी यांच्या सोबत व्यासपीठावर माजी खासदार पवन वर्मा सुद्धा उपस्थित होते. प्रेक्षकांमध्ये लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, खा. मजीद मेमन, शत्रुघ्न सिन्हा, सुधीन्द्र कुलकर्णी उपस्थित होते.