
स्थैर्य, सोलापूर, दि. ५ सप्टेंबर : गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी सिस्टीम आणि लेझर लाईटच्या वापरावर सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी घातलेल्या बंदीला स्थगिती देण्यास सोलापूर दिवाणी न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता हे महत्त्वाचे असल्याचे नमूद करत, न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश कायम ठेवले आहेत. या निर्णयामुळे, सोलापूर जिल्ह्यात २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत डॉल्बी आणि लेझर लाईटच्या वापरावर बंदी असणार आहे.
सोलापूरचे जिल्हाधिकारी श्री. कुमार आशीर्वाद यांनी, डॉल्बी आणि लेझर लाईटमुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन, तसेच अनेक नागरिक आणि सामाजिक संघटनांच्या निवेदनांची दखल घेऊन, जिल्ह्यात बंदीचे आदेश जारी केले होते. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ (१) अन्वये त्यांनी हे आदेश दिले होते.
या आदेशाविरोधात, श्री. योगेश पवार यांनी सोलापूर दिवाणी न्यायालयात (वरिष्ठ स्तर) याचिका दाखल करून जिल्हाधिकाऱ्यांचा बंदीचा निर्णय बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते आणि त्यावर स्थगिती देण्याची मागणी केली होती.
तथापि, न्यायालयाने लोकांच्या आरोग्याच्या आणि सुरक्षेच्या मुद्द्याला प्राधान्य देत, जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आणि स्थगितीची मागणी फेटाळून लावली. या निर्णयामुळे, गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषणाविरोधात कठोर भूमिका घेणाऱ्या प्रशासनाला मोठे बळ मिळाले आहे.