दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑगस्ट २०२२ । सातारा । मल्हार पेठ, सातारा येथे पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी व तीन बड्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदार यांच्याशी संगनमत करून निकृष्ट कामाचे तब्बल 48 लाखांचा गैरव्यवहार केल्या प्रकरणी सातारा न्यायालयाने गुन्हे दाखल करण्याचे आदेश पारित केले आहेत. समाजसेवक अनिकेत तपासे यांनी दोन वर्ष अविरत दिलेल्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. त्यामुळेच आता लवकरच पालिका मुख्याधिकारी अभिजित बापट, मुख्य लेखापाल आरती नांगरे, अंतर्गत लेखापाल कल्याणी भाटकर, अभियंता दिलीप चिद्रे व कंत्राटदार ओमकार भंडारे यांच्यावर कलम 420 सह इतर कलमांनुसार गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
मल्हार पेठ, सातारा येथे नाज वॉच ते पुलापर्यंत पालिकेच्या वतीने बंदिस्त गटाराचे काम हाती घेण्यात आले होते. ते काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे अनिकेत तपासे यांनी वेळोवेळी पालिका मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी यांना लेखी स्वरूपात आणि फोटो आणि व्हिडिओ शूटिंग पेन ड्राईव्ह देवून केले होते. मात्र पालिकेने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून केवळ उडवा उडवीची उत्तरे देवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केले. मात्र तपासे यांनी मागणीवर ठाम रहात अखेर न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.
अखेर सातारा न्यायालयाने तपासे यांच्या तक्रारीत सत्यता असल्याचे निष्कर्ष काढत अखेर नुकतेच सातारा पालिका मुख्याधिकारी अभिजित बापट, मुख्य लेखापाल आरती नांगरे, अंतर्गत लेखापाल कल्याणी भाटकर, अभियंता दिलीप चिद्रे व कंत्राटदार ओमकार भंडारे यांच्यावर कलम 420 सह इतर कलमांनुसार गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे साहजिकच भ्रष्ट कारभाराला एक सणसणीत चपराक न्याय व्यवस्थेने दिली असून लवकरच सातारा शहर पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करावे लागणार आहे, अशी माहिती अनिकेत तपासे यांनी दिली.
दरम्यान, ह्या 48 लाखांचा अपहारामध्ये स्थानिक नगरसेवक यांनीअप्रत्यक्ष कंत्राटदार ओमकार भंडारे यांच्याकडून काम घेवून स्वतः भ्रष्टाचार करण्याच्या हेतूने वॉर्डातील ओढ्याच्या कडेची संरक्षक भिंत कामात देखील निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले आहे. या कामासह भंडारे यांच्या नावाने घेतलेल्या सर्व कामांची उच्च स्तरीय चौकशी व्हावी तसेच कराड येथील अभियांत्रिकी विद्यालय मार्फत बोगस गुणनियंत्रण चाचणी अहवाल दिले गेले आहेत. त्यामुळे विद्यालय व संबंधित नगरसेवकांना तपासाअंती गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच परिसरात झालेल्या सर्वच कामात 8 ते 9 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. वास्तविक संबंधित नगरसेवक व कंत्राटदार हे नगर विकास आघाडीचे नगरसेवक व ठेकेदार समर्थक आहेत.