स्थैर्य, जळगाव, दि.३ : प्रेमविवाह केल्यामुळे सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याच्या रागातून तुम्हालाही समाजातून काढून टाकेन, असे तरुणीच्या वडिलांनी धमकावल्यामुळे प्रेमविवाहानंतर आरती विजय भोसले आणि प्रशांत विजयसिंग पाटील या तरुण दांपत्याने आत्महत्या केली. याप्रकरणी प्रशांतच्या बहिणीने शनिवारी धरणगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आरतीचे वडील विजय हरसिंग भाेसले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी त्यांना अटक केली. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील प्रशांत व आरती या दोघांनी घरातून पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. २९ डिसेंबरला ते पाळधी पोलिस ठाण्यात हजर झाले. +त्यानंतर ती सासरी नांदायला गेली होती.
दोन दिवसांनी म्हणजेच शुक्रवारी सकाळी सात वाजता आरतीचा मृतदेह घरी एका खोलीत आढळून आला होता. तिचा पती प्रशांत पाटील हा दुसऱ्या खोलीत बेशुद्धावस्थेत आढळून आला होता. पत्नीपाठोपाठ प्रशांतचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. तत्पूर्वी प्रेमविवाह केल्याने विजय भोसले यांनी त्याच्या घरी जाऊन शिवीगाळ केली. लग्नामुळे माझी समाजात प्रतिष्ठा राहिली नाही. तुम्हालाही जगू देणार नाही, असे धमकावून दोघांचा अपमान केला. त्यांना विजय भोसले यांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची फिर्याद प्रशांतची बहीण कविता पाटील यांनी दिली आहे.