दैनिक स्थैर्य । दि.२२ नोव्हेंबर २०२१ । सातारा । जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असून तीन वाजेपर्यंत 90 टक्क्यांहून अधिक मतदान झाले. कराड सोसायटी मतदारसंघात १००% मतदान झाले असून दहा जागांसाठी वीस उमेदवारांचे राजकीय भवितव्य पेटीबंद झाले आहे. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आणि ॲड. उदयसिंह पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व विधान परिषद, सभापती रामराजे नाईक निंबाळकर यानी दुपारनंतर मतदानाचा हक्क बजावला.
कराड सोसायटी मतदारसंघातील उमेदवार आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सहकार पॅनेलच्या १० जागा विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी बोलताना पाटील यांनी पाच वाजेपर्यंत शंभर टक्के मतदान होईल अशी अपेक्षा असून जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रबोधन झाले आहे .त्यामुळे मतदान शंभर टक्के होईल अशी खात्री असल्याचे सांगितले. जावळी मतदारसंघात झालेल्या वादाबाबत बोलताना मंत्री पाटील म्हणाले, जावळी मध्ये सकाळी किरकोळ वाद झाला. मात्र तो वाद मिटला असून ज्यांनी वाद केला ते दोघे दुपारनंतर एकत्र वावरत होते.
सहकार पॅनेलचे 21 पैकी 11 जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित दहा जागांसाठी आज मतदान होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे सकाळी दहा वाजेपर्यंत 31 टक्के तर दुपारी दीड वाजेपर्यंत 68 टक्के तर मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 89.6 टक्के मतदान झाल्याचे सांगितले .एकूण 1963 मतदारांपैकी 1711 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता. शशिकांत शिंदे विरूद्ध ज्ञानदेव रांजणे असा हाय व्होल्टेज ड्रामा रंगलेल्या जावली तालुक्यात चुरशीने 98% टक्के मतदानं झाले. त्याखालोखाल पाटण कोरेगाव व सातारा तालुक्यात 94% तर कराड तालुक्यात शंभर टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. मतदारांचा कौल मतपेटीत बंद झाल्याने आता निकालाची उत्सुकता वाढली असून राष्ट्रवादी नेत्यांची ही धाकधुक वाढली आहे. येत्या 23 तारखेला जरंडेश्वर नाका येथे नागरी सहकारी बँक असोसिए१ानच्या सभागृहात सकाळी दहा वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरवात होणार आहे. या दिवसभरातील घडामोडीविषयी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले राष्ट्रवादी सहकार पॅनेलच्या दहा जागाही चांगल्या मताने निवडून येतील असं सांगितले.