दैनिक स्थैर्य । दि. १६ डिसेंबर २०२१ । फलटण । नाईकबोमवाडी औद्योगिक वसाहतीसाठी १८६ हेक्टर भूसंपादन झाले असून ग्रामस्थांनी सुमारे १२० हेक्टर जमीन औद्योगिक वसाहतीसाठी स्वतःहुन देऊ केली असल्याचे निदर्शनास आणून देत तालुक्यात ही दुसरी औद्योगिक वसाहत लवकरच पूर्णत्वास जाईल आणि या भागात आर्थिक स्थैर्य निर्माण होईल असा विश्वास जिल्हा परिषद व जिल्हा नियोजन मंडळ सदस्या अड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.
राज्य शासनाच्यावतीने एम. आय. डी. सी. चे वरिष्ठ अधिकारी आणि मोजणी विभाग यांच्या संयुक्त सहभागाने संपादित क्षेत्राची मोजणी सुरु करण्यात आली असून याची प्रत्यक्ष पाहणी आज जिल्हा परिषद व जिल्हा नियोजन मंडळ सदस्या अड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, तातमगिरी देवस्थान ट्रस्टचे संचालक राजेंद्र निंबाळकर, बापूराव चव्हाण, काकासाहेब खराडे स्थानिक ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत मोजणी कामाची व जागेची पाहणी करण्यात आली त्यावेळी अड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर बोलत होत्या.
खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून फलटण, माण, माळशिरस तालुक्यातील युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांना लघु उद्योगांची उभारणी करता यावी आणि या तालुक्यांचे आर्थिक स्थैर्य व पूर्व भागाचा विकास व्हावा या उद्देशाने तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करुन नाईकबोमवाडी येथे तालुक्यातील दुसरी औद्योगिक वसाहत मंजूर करण्यात आली, शासकीय नियमानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सरकारने जमीन अधिग्रहण करुन घेतली व त्यावर औद्योगिकीकरणाचे शिक्के पडले त्यानंतर पुढचा टप्पा म्हणून या क्षेत्राची मोजणी राज्य शासनाच्या वतीने एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी व मोजणी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आली
असल्याचे यावेळी सांगण्यात आले.