बनावट नोटा प्रकरण : सहा जणांच्या पोलीस कोठडीत वाढ


स्थैर्य, पुणे, दि. 15 : भारतीय चलनातील 87 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्याप्रकरणात मुख्य आरोपी लष्करी लान्स नाईकसह अटक केलेल्या सहा जणांच्या पोलीस कोठडीत पाच दिवस वाढ करण्यात आलेली आहे.

शेख अलिम समद गुलाब खान (वय 36, रा. जेडीसी पार्क, प्रतिकनगर, येरवडा) असे या लान्स नाईकचे नाव असून तो संरक्षण दलातील बॉम्बे इंजीनियरिंग ग्रुप खडकी या ठिकाणी कार्यरत आहे. त्याच्यासह सुनिल बद्रीनारायण सारडा (वय 40), अब्दूल गणी रहेमत्तुल्ला खान (वय 43), अब्दुर रहेमान अब्दुलगणी खान (वय 18), रितेश रत्नाकर (वय 34) आणि तुफेल अहमद महमद इशोक खान (वय.28) या सर्वांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

विमाननगर भागातील एका बंगल्यात बनावट नोटांचा साठा मोठ्या प्रमाणावर करून ठेवल्याची माहिती लष्करी गुप्तचर यंत्रणेला (एमआय) मिळाली होती. याबाबतची माहिती देण्यात आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली होती. गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस निरीक्षक अंजुम बागवान या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

बचाव पक्षातर्फे ऍड. हेमंत झंजाड, ऍड. पुष्कर दुर्गे आणि ऍड. भूपेंद्र गोसावी यांनी काम पाहिले. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने सर्वांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी आरोपींची टोळी असून, अनेक जणांची फसवणूक केल्याची शक्‍यता आहे. त्याच्या शोधासाठी, तसेच ही रक्कम कशासाठी ठेवली, कोठे छापली, पोलिसांना मुंबई, हैदराबाद येथे जावून तपास करायचा आहे, त्यामुळे सर्वांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी पक्षाने केली. तर, आरोपींचा गुन्ह्याशी काहीही संबंध नसून, खेळण्यांच्या नोटांचे ते व्यापारी आहेत. या नोटा फसवणूकीसाठी वापरल्या नसल्याचा युक्तीवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!