दैनिक स्थैर्य । दि. 12 जानेवारी 2022 । फलटण । फलटण नगरपरिषदेचे तत्कालीन लिपिक विष्णू केंजळे यांच्या माध्यमातून तत्कालीन सत्ताधारी व मुख्याधिकारी यांनी माझ्यावर खोटी केस दाखल केलेली होती. मला राजेगटाने ज्या खोट्या गुन्ह्यात अडकवले होते त्यातुन माझी निर्दोष मुक्तता सातारा जिल्हा न्यायालयाने केलेली आहे. आता आगामी काळामध्ये पुन्हा नगरपालिकेची सर्व प्रकरणे बाहेर काढणार आहे. त्यावेळी टी फाईव्ह असो आत्ताचा भुयारी गटार योजना किंवा पाणीपुरवठा व बांधकाम विभागातील भ्रष्टाचार पुराव्यानिशी लवकरच बाहेर काढणार आहे, असे मत माजी नगरसेवक अनुप शहा यांनी यावेळी स्पष्ट केले.
फलटण येथील भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत अनुप शहा बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे स्वीय सहाय्यक काकासाहेब खराडे, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सागर शहा, कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब काशीद, मराठी पत्रकार परिषदेचे फलटण तालुकाध्यक्ष रमेश आढाव, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सौ. उषा राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
माजी आमदार कै. हरिभाऊ निंबाळकर यांच्या सारख्या मोठ्या माणसाने फलटण तालुक्यातील पत्रकारांचे नेतृत्व केलेले आहे. फलटण तालुक्यातील पत्रकार हे विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम कायमच करत असतात. मी ज्यावेळी राजेगटात गेलेलो होतो, त्यावेळी सुध्दा मी हुजरे आणि मुजरे कधीही केले नाहीत व करणार सुध्दा नाही. आम्ही केलेल्या तक्रारीवर निकाल देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या पेनातील शाई संपत असेल किंवा त्यांना शाई पुरवली जात नाही. जिल्हाधिकारी यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता कामकाज करणे गरजेचे आहे. सातारचे जिल्हाधिकारी यांचे आडनाव जरी सिंह असले तरी ते मांजरीसारखे वागत आहेत, असा टोला सुद्धा यावेळी शहा यांनी लगावला.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार भारतीय जनता पार्टीच्या वतीने पत्रकार दिन व मकरसंक्रांतीचे औचित्य साधून आज पत्रकार दिन साजरा केला जात आहे. तालुक्यातील सर्व पत्रकारांनी तालुक्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम कायमच केलेले आहे व आगामी काळामध्ये सुद्धा नक्कीच करतील असा विश्वास आम्हा सर्वाना आहे. फलटण तालुक्यातील पत्रकरांना एक आगळी वेगळी अशी परंपरा आहे. ते जपण्याचे कामकाज हे तालुक्यातील पत्रकार करीत आहेत, असे मत भारतीय जनता पार्टीचे फलटण तालुकाध्यक्ष बजरंग गावडे यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी जेष्ठ पत्रकार चंद्रकांत काळे यांनी सूत्रसंचलन केले तर प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सागर शहा यांनी आभार मानले.