राजेगटाच्या विकासरथाच्या अवलंबन प्रक्रियेकरीता ‘टेक्नॉलॉजी’ कळणार्‍या नगरसेवकांना नगरपालिकेवर पाठवावे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि.२०: फलटण संस्थानचे अधिपती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अथक परिश्रमातून फलटण शहर व तालुक्यातील विविध विकासकामांसाठी सुमारे 274 कोटी 98 लाख रुपयांची भरीव तरतूद राजेबंधूंच्या विकासकामांच्या दूरदृष्टी विचारातून करण्यात आलेली आहे. फलटण नगरीत भुयारी गटार योजनेचे काम सुरु असल्यामुळे रस्त्यांची दुरावस्था पहायला मिळत असली तरी फलटणकर सूज्ञ जनतेने राजेबंधूंच्या विकासपर्वाचे व विकासप्रक्रियेचे अंत:करणपूर्वक स्वागतच केलेले आहे. भुयारी गटार योजनेमुळे खराब झालेले रस्ते दुरुस्तीचे काम अनेक ठिकाणी सुरु झाले असून शहरातील उर्वरीत रस्त्यांची विकासप्रक्रिया श्रीमंतांनी उपलब्ध केलेल्या निधीमुळे लवकरच पूर्ण होणार आहे.

राज्यशासनाच्या धोरणामुळे फलटण शहरातील सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण उठविल्यामुळे शहरातील नागरिकांना रस्त्यांवरुन जात असताना मोकळा श्‍वास घेता येत आहे. विशेष म्हणजे अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे शहरातील नाना पाटील चौकातील वाहतूक कोंडीला मोठ्या प्रमाणावर आळा बसला असून या ठिकाणच्या अतिक्रमणांचे पूर्नवसन श्रीमंत रामराजे शॉपींग सेंटर लगतच्याच नगरपालिका गाळ्यांमध्ये केल्यामुळे एका नविन मार्केटची भर फलटण शहराच्या वैभवात पडली आहे. अतिक्रमणांच्या पुर्नवसनामधील पूर्वीचे श्रीमंत रामराजे शॉपींग सेंटरच्या रुपाने राजे बंधूंनी संपूर्ण देशाला अतिक्रमण पुर्नवसनाचा उत्तम आदर्शच घालून दिला आहे.

पूर्वी आपण रात्री 9 नंतर बडेखानच्या रोडने फलटणला यायला घाबरत असायचो. पण आता राजे बंधूंच्या अथक परिश्रमामुळे शिरवळपासून ते सुरवडीपर्यंत औद्योगिकक्रांतीची सोनेरी पहाट जागवणारी कंपन्यांची विद्युत रोषणाई आपल्याला रात्रीच्या वेळी दिसून येते. हे केवळ आणि केवळ राजेबंधूंच्या शहरी व ग्रामीण भागाचे आर्थिक परिवर्तन करण्याच्या विचारांमुळेच.

श्रीमंत रघुनाथराजे यांनी आपल्या अफाट कल्पकतेतून फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीला संपूर्ण राज्यात नव्हे तर देशात एक ‘आयडॉल’ बाजार समिती बनवली आहे. या ठिकाणी शेतकर्‍यांच्या हितासाठी राबवण्यात येणार्‍या विविध योजना श्रीमंत रघुनाथराजे यांच्या आधुनिक विचारांमुळे अल्पकाळात यशस्वी झाल्याचे सर्वांनीच पाहिले आहे. कृषिदेव पेट्रोलियम, मालोजी शिदोरी व शिवभोजन, शेतकर्‍यांसाठी एस.एम.एस.द्वारे बाजारभाव सुविधा, महाराजा मालोजीराव नाईक निंबाळकर कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स अशा एक ना अनेक शेतकरीहिताय योजना या ठिकाणी अखंडपणे सुरु असून त्यामध्ये दिवसेंदिवस भरच पडत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आत्ताच्या कोवीड – 19 च्या भयानक काळात फलटण तालुक्याच्या कानाकोपर्‍यात पोचून बाजार समितीच्या माध्यमातून करण्यात आलेली नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी तालुक्यासाठी अभिमानास्पद अशीच आहे.

फलटण तालुक्याच्या विकासकार्याची शालीन जोड श्रीमंत संजीवराजे व श्रीमंत शिवांजलीराजे आहेत. त्यांनी गोविंद दूध प्रकल्प उभारुन फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्याच्या अनेक भागात ग्रामीण जनतेमध्ये दुग्धव्यवसायिकांना चालना मिळवून देवून श्रीमंत संजीवराजेंच्या गोविंदच्या यशस्वी प्रयोगाचा फायदा व अनुभव असंख्य दुग्धव्यवसायीकांना आपल्या प्रापंचिक जीवनात आर्थिक परिवर्तनाने मिळत आहे. गोविंद दूध प्रकल्पाच्या निर्मितीनंतर तालुक्यात दुग्धव्यवसाय वाढीला चालना तर मिळालीच शिवाय हजारो युवकांना रोजगार निर्मितीही गोविंदच्या दूध प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध झाली. यामुळे ग्रामीण स्वयंरोजगारासाठी दुग्धव्यवसाय हाच पर्याय; हे सत्य श्रीमंत संजीवराजे व श्रीमंत शिवांजलीराजे या शालीन नेतृत्त्वाच्या जोडीने आपल्या गोविंद दूधच्या शिस्तबद्ध प्रशासनातून सिद्ध करुन दाखवले आहे.

फलटण तालुक्यात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या आहेत. या निवडणूकीत सूर्यप्रकाशा इतका लख्ख विजय राजे गटाचा झालेला आहे. आगामी काळात फलटण नगरपालिका निवडणूक येऊ घातली असून या निवडणूकीतही जनता विकासकामांना साथ म्हणून राजे गटाच्या पाठीशी उभी राहील यात शंका नाही. पण हे करत असताना आजवर ज्याप्रमाणे राजेबंधूंनी कर्तव्यदक्ष कार्यकर्त्यांना नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली त्याचप्रमाणे आताही देताना काळानुरुप बदलासाठी आधुनिक विचारांच्या, तंत्रज्ञानाशी सुसंगत असणार्‍या कार्यकर्त्यांना संधी द्यावी अशी जनतेतून अपेक्षा आहे.

– डॉ.श्रीकांत कृष्णराव मोहिते,
माजी पशुप्रांत, ओंकार गार्डन, लक्ष्मीनगर, फलटण.
मो. 9403940761


Back to top button
Don`t copy text!