दैनिक स्थैर्य । दि. १० एप्रिल २०२३ । मुंबई । लाभार्थ्यांच्या हिताच्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ जातीने लक्ष देऊन काम करेल. भविष्यात त्या त्या तालुक्यातील लोकांच्या कर्ज प्रकरणांबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एका समन्वयकाची नेमणूक करू. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना महामंडळाच्या योजनांचा लाभ देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याचे काम करू. व्यावसायिकांच्या पाठिशी महामंडळ खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) नरेंद्र पाटील यांनी केले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा लाभार्थी – बँक संवाद मेळावा धनंजय गार्डन हॉल, सांगली येथे संपन्न झाला. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार दिनकर पाटील, इस्लामपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील, सत्यजीत देशमुख, दिपक शिंदे, पृथ्वीराज पवार आदि मान्यवर उपस्थित होते.
श्री. नरेंद्र पाटील म्हणाले, महाराष्ट्रात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचे 60 हजार लाभार्थी असून विविध बँकांनी जवळपास 4 हजार 62 कोटींचे कर्ज वाटप केले आहे. शासनाने 390 कोटींचा व्याज परतावा महामंडळाच्या लाभार्थ्यांना दिला आहे. कर्ज वाटपात सांगली जिल्ह्यातही चांगले काम झाले असून महामंडळाच्या माध्यमातून जवळपास 24 कोटींचा व्याज परतावा लाभार्थ्यांना दिला आहे. वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा 10 लाखाहून 15 लाखापर्यंत वाढविण्यात आली असून व्याज परतावा कालावधी जास्तीत जास्त 7 वर्ष इतके आहे. सामान्य व्यवसाय करणाऱ्यांनाही कर्ज पुरवठा महामंडळाकडील योजनांमधून होतो. छोट्या उद्योगासाठी दोन लाखापर्यंतचे कर्ज प्रोजेक्ट रिपोर्ट विना मिळू शकते. ट्रॅक्टर योजनाही लवकरच सुरू करणार आहोत. महामंडळाच्या लाभार्थ्यांना थेट मॅन्युफॅक्चरकडून विशेष सवलतीमध्ये ट्रॅक्टर मिळण्यासाठी मागणी केली असल्याचे ते म्हणाले. अडचणी अनेक आहेत पण त्यावर मात करण्याचे काम केले पाहिजे. लाभार्थ्यांनी विविध बँकाच्या स्टॉल्सला भेटी देवून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, बऱ्याच विद्यार्थ्यांची फी भरण्याची परिस्थिती नसते अशा विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी तसेच डीग्री घेतल्यानंतर पुढे काय करावे यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी व कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी आवश्यक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडील योजनांची कर्ज प्रकरणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून मंजूर करण्यास सुरूवात केली असून 5 कोटी 52 लाखाची कर्ज प्रकरणे मंजूर करून वितरीत केली आहेत. महामंडळाच्या योजनांचा युवकांना लाभ देण्यासाठी तालुकानिहाय बँकेचे अधिकारी नेमून पाठपुरावा केला जाईल. ज्याप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती बँक पीक कर्ज वितरणात अव्वल आहे त्याचप्रमाणे युवकांच्या बाबतीतही बँक चांगले काम करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी उपस्थित विविध बँकांचे अधिकारी व प्रतिनिधी यांनी मार्गदर्शन करताना कर्ज प्रकरणात प्रोजेक्ट रिपोर्ट महत्वाचा असल्याचे सांगितले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेतलेल्या यशस्वी लाभार्थ्यांचा व कर्ज वितरणात उत्कृष्ट काम केलेल्या बँक प्रतिनिधींचा तसेच शाहीर प्रसाद विभूते यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
प्रास्ताविकात महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक आकाश मोरे यांनी महामंडळाच्या योजनांविषयी सविस्तर माहिती दिली व आभार मानले.