नाशिक विभागीय माहिती कार्यालयातील प्रदर्शन सहाय्यक राजेंद्र येवले यांचे कोरोनाने निधन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नाशिक, दि. ०९: नाशिक विभागीय माहिती कार्यालयातील प्रदर्शन सहाय्यक राजेंद्र हिरामण येवले (वय ५० वर्षे) यांचे आज धुळ्याच्या भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाने निधन झाले.

विभागीय माहिती कार्यालयात प्रदर्शन सहाय्यक पदावर कार्यरत असलेल्या राजेंद्र येवले यांना १२ दिवसांपूर्वी कोरोनाची लक्षणे आढळल्याने रूग्णालयात भरती करण्यात आले होते. स्व. येवले हे लिपीक टंकलेखक म्हणून जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव येथे ९ सप्टेंबर 1996 रोजी रूजू झाले होते. त्यानंतर त्यांनी धुळे, नाशिक येथे विविध पदांवर सेवा केली.

विभागीय माहिती कार्यालयात प्रदर्शन सहाय्यक या पदावर 1 ऑगस्ट 2016 रोजी त्यांना पदोन्नती देण्यात आली होती. शासकीय जाहिरात व्यवस्थापन, आस्थापना व लेखा विषयक कामकाजात श्री. येवले यांनी नाशिक विभागात उल्लेखनीय योगदान दिले होते. कोरोना काळात वर्षभर त्यांनी अत्यंत जबाबदारीने सोपवलेली जाहिरात वितरणाची कामगिरी पार पाडली होती.

स्व. येवले यांच्या निधनाबद्दल माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे, संचालक (प्रशासन) गणेश रामदासी, संचालक (माहिती-वृत्त) गोविंद अहंकारी, उपसंचालक (प्रशासन) डॉ.गणेश मुळे, नाशिक विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या निधनाने विभागीय माहिती कार्यालयातील एक अनुभवी माध्यमकर्मीला आपण मुकलो असल्याची भावना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.


Back to top button
Don`t copy text!