स्थैर्य, बारामती, दि. 01 : बारामती शहरातील भिगवण रस्त्या नजीक अर्बनग्राम येथील एका २२ वर्षीय आयटी इंजिनियरला करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर तरुण हा मागील काही दिवसांपासून वर्क फ्रॉम होम करीत होता, मात्र पुणे येथे होमिओपॅथी औषध उपचारासाठी त्याचे जाणे झाल्याने त्या दरम्यानच्या प्रवासातच करोनाची बाधा झाल्याचा संशय आहे.
सदर आयटी इंजिनियर तरुण हा २१ जून रोजी पुणे येथील निगडी येथे गेला होता. कामानिमित्त तो दिवसभर तेथेच होता. तेथून पुन्हा बारामतीला आल्यानंतर त्यास सर्दीचा त्रास जाणवू लागल्याने त्याने स्वत:हून बारामती येथील रुई ग्रामीण रुग्णालय जाऊन तपासणी करण्याचा निर्णय घेतला. तपासणीत तो पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यास सध्या रुई येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यास किरकोळ लक्षणे आहेत.
दरम्यान, त्यांच्या संपर्कातील सहा जणांची करोनाची तपासणी करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बारामती करोनामुक्त होती. या आयटी इंजिनीयरच्या माध्यमातून पुन्हा एकदा बारामतीमध्ये करोनाचा शिरकाव झाला आहे.