स्थैर्य, सातारा, दि. २४ : मेढा नगरीत करोना चा शिरकाव झाल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले असून जनजीवन विस्कळीत होवू लागले आहे.
मेढा शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत जात होती परंतु आता मात्र मेढा नगरीतच करोना रुग्ण सापडल्याने मेढा गावाला धोक्याची परिस्थीती निर्माण झाली आहे. सुरुवातीला मेढा येथे १ करोना रुग्ण सापडल्याने प्रभाग क्र ८व ९ सील करण्यात आला होता. परंतु त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने नागरीकांना दिलासा मिळाला होता यामुळे या प्रभागाचे लॉक डाऊन उठवावे अशी मागणी नगरसेविका सौ. निलम जवळ यांनी केली होती.
मेढा नगरीत अजुन दोन रुग्णांची वाढ झाल्याने या परिसरात योग्य ती दक्षता घेण्याचे काम जावली तहसिलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी सतिश बुध्दे, तालुका वैद्यकिय अधिकारी भगवान मोहिते, मेढा नगरपंचायत मुख्याधिकारी अमोल पवार आणि सर्व सहकारी स्टाफ घेत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मेढा येथिल नागरिकांच्या जीवनाचा प्रश्न निर्माण झाल्याने मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, नगरसेविका यांनी मेढा बाजारपेठ बंद ठेवण्याची भुमिका घेतली आहे.
लॉकडाउन होण्यास काही कालावधी शिल्लक असताना परिसरातील नागरीकांनी , ग्राहकांनी मोठया प्रमाणात गर्दी केल्याने मेढा बाजारपेठ पूर्णपणे आठवडा बाजाराचे रुपात भरलेली दिसून येत होती. मेढा पोलिस स्टेशनचे स. पो.नि. निळकंठ राठोड आणि स्टाफ यांनी बाजारपेठेतील नागरिकांना सोशल डिस्टन्स बाबत सुचना करीत नियमाचे पालन करण्याचा सल्ला दिला परंतु तरीही काही ठिकाणी याबाबत गांभिर्य न घेता माल घेतला जात होता.मेढा येथे कोरोना रुग्ण सापडल्याने संपूर्ण गाव भितीच्या छायेखाली वावरत आहे. अजुन किती रुग्ण सापडणार याचीच चर्चा सर्वत्र सुरु आहे.