कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे फलटणला प्रशाशन ऍक्टिव्ह मोडवर; प्रांताधिकारी व पोलीस उपअधीक्षकांचे ग्राउंड वर्क सुरु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०४ डिसेंबर २०२१ । फलटण । कोरोनाचा ओमिक्रोन हा व्हेरिएंट जगामध्ये नव्याने सापडला आहे. त्यामुळे सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोनाबाबतच्या नियमावलीबाबत नव्याने आदेश पारित केले आहे. सदरील आदेशाची अंमलबजावणी हि फलटण तालुक्यात काटेकोरपणे बजवण्यासाठी फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप व पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी संपूर्ण फलटणचे प्रशासनाचा ऍक्टिव्ह मोड ऑन करून कामकाज सुरु केलेले आहे. प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप व पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे हे स्वतः ग्राउंडवर उतरून कामकाज करीत आहेत.

फलटण येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, श्री महावीर स्तंभ, सुपर मार्केट परिसर (जुने लाटकर व्यासपीठ) आदी ठिकाणांसह विविध ठिकाणी प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप, पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, नगरपरिषद अधिकारी विनोद जाधव यांच्यासह महसूल, पोलीस व नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली. यावेळी ज्यांनी लसीकरण केलेले नाही त्यांना समज देवून आजच्या आज लसीकरण करून घेण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले.

आज फलटणमध्ये मास्क न घालणाऱ्या वाहनचालकांवर, व्यापारी दुकानामध्ये व नागरिकांना आज मास्कचे वाटप करून समज देण्यात आली आहे. उद्यापासून जे मास्क न घालता बाहेर पडतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे. फलटण तालुक्यामधील सर्व आस्थापना चालकांनी त्यांचे व त्यांच्याकडे कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असल्याचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. ज्या अस्थापनामध्ये दोन्ही डोस झालेले कर्मचारी नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. नवीन नियमानुसार दुकानामध्ये दोन्ही डोस पूर्ण झालेलेच नागरिकांना प्रवेश देण्यास मुभा आहे, तरी सदरील नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल असेही यावेळी प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप व पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी स्पष्ट केले.

सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दि. २९ नोव्हेंबर रोजी कलम १४४ प्रमाणे नव्याने आदेश पारित केलेले आहेत. सदरील आदेशानुसार कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. कोरोनाचे नियम म्हणजेच मास्क वापरणे, सुरक्षित अंतर राखणे व सॅनिटायझरचा वारंवार उपयोग करणे ह्या जर उपाययोजना करण्यात आल्या नाहीत तर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. फलटण तालुक्यातील सर्व अस्थापनांनी सुद्धा कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. दोन्ही लस झालेल्या नागरिकांनाच मास्क परिधान केला असल्याची खात्री करूनच अस्थापनांमध्ये प्रवेश देण्यात यावा. अन्यथा सदरील अस्थापनेविरुद्ध सुद्धा दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असेही प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी नुकतेच पारित केलेल्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी फलटण उपविभागात झाली पाहिजे. जर कोणत्याही नागरिकांनी किंवा अस्थापनाधारकांनी कोरोनाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. फलटणची प्रभू श्रीराम यात्रा रद्द करण्यात आलेली आहे. ज्यांचे लसीकरणाचे दोन्ही डोस झालेले आहेत फक्त त्यांनाच प्रभू श्रीरामाचे दर्शन मिळणार आहे. श्रीराम मंदिर परिसरामध्ये भाविकांनी गर्दी न करता म्हणजेच ग्रुपनी दर्शन घेण्यासाठी येण्यापेक्षा स्वतंत्र दर्शनासाठी येण्यास प्राध्यान्य द्यावे. ट्रस्टच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑनलाईन दर्शनाचा सुद्धा भाविकांनी लाभ घ्यावा, असे मत फलटणचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी यावेळी व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!