स्थैर्य, सातारा, दि. 02 : करोना हा व्हायरस एवढा घातक आहे की एकाचे दोन दोनाचे बहु असे पसरत जातो. त्यामुळे देशाबरोबर जिह्यात करोनाची मार्च महिन्यात एण्ट्री झाली. आता पाचशेचा टप्पा ओलांडला असून करोनाला अडवण्यासाठी जिह्यातील आरोग्य विभाग, पोलीस आणि महसूल विभाग हे करोना योध्दा म्हणून काम करत आहेत. सगळ्यात जास्त जवळचा संबंध येतो तो आरोग्य विभागाचा. जिह्यातील आरोग्य विभागातील 13 जण करोनामुळे बाधित झाले आहेत. काहीजण बरे ही झाले आहेत. पोलीस आणि महसुल विभागाने करोनाला जवळ सुद्धा येऊ दिले नाही. जिह्यातील पुढाऱ्यांनी तर लांबूनच ठोकला नमस्कार आणि कलाकार हे स्वतःची काळजी घेत प्रबोधन करताना दिसत आहेत.
जगात करोनाचा कहर पाहतो आहे. करोनाने कोणाला सोडले नाही. श्रीमंत असो किंवा गरीब. मंत्री असो की सर्वसामान्य मजूर करोना ग्रस्त झाले आहे. लाखो लोकांचा जीव घेणाऱ्या करोनाने राज्यात ही कहर केला आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण यांना ही सोडले नाही. सातारा जिह्यात करोनाची एण्ट्री मार्च महिन्यात झाली तेव्हापासून जिह्यातील सुमारे 35 लाख जनतेच्या सुरक्षेसाठी जिह्याची आरोग्य यंत्रणा, महसूल विभाग आणि पोलीस दल जीवाचे रान करत आहेत.
जिह्यातील आरोग्य यंत्रणा ही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांच्या नेतृत्वाखाली जिह्यातील ग्रामीण रुग्णालये, 71 प्राथमिक आरोग्य केंद्र, 400 उपकेंद्रांतील कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा वर्कर आणि खाजगी रुग्णालयात कर्मचारी असे हजारो कर्मचारी वैद्यकीय सेवा देत आहेत. ही सेवा देत असताना समोरच रुग्ण अगोदर करोना बाधित आहे हे समजत नसल्याने व त्यांच्याकडून योग्य माहिती दिली जात नसल्याने तब्बल जिह्यातील 1600 आरोग्य कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन व्हावे लागले. काहीजण उपचार घेत आहेत तर 13 जण बाधित झाले आहेत. त्यातील काहीजण बरे होऊन घरी क्वारंटाइनमध्ये आहेत. यामध्ये आरोग्य सेविका, फ्रामासिस्ट, एक्सरे टेक्निशन, दोन चालक, एक सफाई कामगार आणि एक खासगी वैद्यकीय व्यावसायिक अश्या 13 जणाचा समावेश आहे. आरोग्य यंत्रणा किती जरी काळजी घेत असली तरी थोडीशी सवलत मिळताच लगेच कोरोना चिकटत आहे. त्यामुळे जिह्यातील आरोग्य विभाग ही आता ताक फुंकून पिऊ लागला आहे.
इकडे महसूल विभागाचे प्रमुख व जिह्याचे प्रमुख जिल्हाधिकारी शेखर सिंह हे स्वतः काळजी घेत असल्याने जिह्यातील ज्या ज्या करोना बाधित क्षेत्राला भेट देण्यास महसूल विभागाचे प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी गेले तरी काळजी घेतात त्यामुळे करोनाला त्यांनी जवळ फिरकू दिले नाही. तसेच आपल्या कार्यालयात काळजी घेत आहेत.
तब्बल दोन महिने रस्त्यावर दंडुका हाती घेऊन करोनाला अडवणारे जिल्हा पोलिसदल. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिह्यातील 30 पोलीस ठाण्यातल्या 3 हजार कर्मचारी मेहनत घेत होते. रस्तावर फिरणारा कोण कसा आहे हे सांगू शकत नाही. कारवाई करायला गेले, मारहाण करायला गेले तरी करोना होण्याची भीती त्यामुळे पोलिसांनी सावधगिरी बाळगली गेल्याने जिह्यातील खाकीला करोनाने स्पर्श ही केला नाही.
जनता संकटात असल्याने जनतेला आधार देण्यासाठी जिह्यातील पुढारी ही गप्प बसतील कसे. लॉकडाऊनच्या काळात राज्यमंत्री शंभूराज देसाई, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील यांनी अतिशय काळजी घेऊन आपले मतदार संघ पिंजून काढले. करोना बाधित गावांना आधार देण्याचे काम केले. त्यांनी घेतलेल्या काळजीमुळे कोरोनाला लांबूनच नमस्कार केला आहे. तर स्थानिक पुढाऱ्यांची तीच गत आहे. कलाकारांनी तर घरच सोडले नाही. चित्रीकरण बंद असल्याने घरातच राहुन स्वतःची काळजी घेत आहेत.