विकासकामावर कोरोनाचा परिणाम होवू देणार नाही : मंत्री बाळासाहेब पाटील


स्थैर्य, कातरखटाव, दि. ०६ : कोरोना संसर्गजन्य आजारामुळे शासनाच्या अनेक योजनांच्या निधीमध्ये मोठी कपात होणार आहे. असे असले तरी कराड उत्तर मतदारसंघाच्या विकासकामावर कोरोनाचा कोणताही परिणाम जाणवू देणार नाही. अशी ग्वाही राज्याचे सहकार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी दिली.

शेनवडी (ता. खटाव) येथे त्यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन, लोकार्पन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव सर्वगोड, मार्केट कमिटीचे माजी सभापती सी. एम. पाटील, मजूर फेडरेशनचे संचालक सचिनशेठ माळी, राजेंद्र चव्हाण, दत्तात्रय रुद्रुके, सहाय्यक निबंधक उमेश उमरदंड, भूषणगडचे माजी सरपंच विलासराव शिंदे, तुकाराम गोडसे, सुभाष कोकाटे, नेताजी सरनोबत, राजू पिसाळ, शाखा अभियंता सुभाषराव खाडे, पी. एम. कुलकर्णी, दिपक पाटील, बबनराव घोडके, शंकर पवार, भरत राऊत, श्री. रसाळ, श्री. माळी, यांची उपस्थिती होती.

मंत्री पाटील म्हणाले, पुसेसावळी भागाचा कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात समावेश झाल्यानंतर कार्यकत्यांनी सुचविलेली बहुतांशी कामे पुर्ण करुन विकासकामाचा अनुशेष बर्‍यापैकी भरुन काढला आहे. भूषणगडला जोडणारे अनेक रस्ते आहेत. त्यामध्ये अनेक अडचणी, अडसर असले तरी आपण मार्ग काढत आहोत. सद्याचे राज्यशासन शेतकरी हिताचे आहे. सहकार खाते व पणन महामंडळाच्या माध्यमातून कापसाबरोबर मुग व इतर खरीप पिकांची हमीभावाने खरेदी केली जाणार आहे. काही खासगी कारखान्यांनी शेतकर्‍यांची ऊसबिले थकविली आहेत. शेतकर्‍यांच्या या तक्रारी साखर आयुक्तापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करु. मात्र यापुढच्या काळात लोकांनी खासगी साखर कारखानदारांच्या नादाला लागू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

सी. एम. पाटील यांनी भाषणात मंत्री पाटील यांच्या माध्यमातून शेनवडी, म्हासुर्णे, होळीचागांव, मायाक्का मंदीर सभामंडप, तुळजाभवानी मंदीर सभामंडप, शेनवडी-निमसोड रस्ता ही सुमारे 70 लाखाची कामे पुर्ण झाल्याचे सांगितले. तर परिसरातील आठ रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी अंदाजे 15 कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. शिवाजी सर्वगोड यांनी मंत्री पाटील यांच्या कार्याची तोंडभरुन स्तुती केली त्याचबरोबर विकासकामांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्नशील असणार्‍या सी. एम. पाटलांच्या नेतृत्वाची जनतेने पाठराखन करण्याचे आवाहन केले. धनंजय क्षीरसागर यांनी सुत्रसंचालन केले. शंकर पवार यांनी आभार मानले.

 

कार्यक्रमात बोलताना ना. बाळासाहेब पाटील, यावेळी व्यासपीठावर सी. एम. पाटील, सर्वगोड, सचिन माळी, राजेंद्र चव्हाण आदी (छाया :समीर तांबोळी)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!