करोनामुळे आळंबी पाहण्याची संधी हुकणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, पांचगणी, दि. 25 : महाबळेश्‍वर येथील जंगल परिसरामध्ये आळंबीच्या दुर्मीळ जाती आढळत असल्याने निसर्गप्रेमींसाठी व वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करणार्‍यांसाठी येथे नैसर्गिक साधन संपत्तीची पर्वणीच लाभली आहे. परंतु सध्या जगभर  करोना  मुळे सुरू असलेल्या लॉकडाउनच्या परिस्थितीमुळे निसर्गप्रेमींची ही सुवर्णसंधी हुकली आहे.

महाबळेश्‍वरला निसर्गाचा वरदहस्त लाभल्याने सह्याद्री डोंगर रांगामधील सर्व प्रकारच्या पर्यटकांसाठी खुला असलेला व निसर्गाचे वरदान लाभलेला परिसर. दरवर्षी येथील जंगलामधील वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी विविध कॉलेजच्या सहली येथे आवर्जून येत असत. त्याचबरोबर निसर्गप्रेमी ट्रेकर्स येथे नेहमी येत असतात. येथील जंगलातील विविध जाती, उपजाती, प्राणी- पक्ष्यांच्या अभ्यासकांसाठी येथे पूर्ण परिसर नेहमीच निसर्गप्रेमींना खुणावत असतो. गेली अनेक वर्षे येथे आळंबी वनस्पतीचे विविध प्रकार पहावयास मिळत आहेत. परंतु सध्या  करोना  च्या संकटामुळे निसर्गप्रेमींना यावेळी पावसाळ्यातील निसर्ग व वनस्पतींच्या अभ्यासाची सुवर्णसंधी हुकली आहे.

पुरुषाच्या जननेंद्रियासारखे स्टिंकहॅार्न नावाचा आळंबीचा प्रकार येथे काही वर्षांपासून आढळू लागला आहे. या वर्षी तर त्याहून वेगळा असा पुरुषाच्या जननेंद्रियाला संपूर्ण बाजूने बाहुलीला नेसलेल्या लेसच्या फ्रॅाकप्रमाणे पेटीकोट नेसल्याप्रमाणे जमिनीपर्यंत जाळी असलेला नवीन प्रकार पहावायास मिळत आहे. त्याचे शास्त्रीय पद्धतीने नाव लाँग नेट स्टिंकहॉर्न किंवा विईल्ड लेडी असे आहे. अत्यंत उग्र वासामुळे कीटक आकर्षित होण्यास मदत होते व चिकट असल्यामुळे कीटकांना हा चिकट द्रव्य चिकटून तो जंगलात पसरवून आळंबीची वाढ व प्रसार होण्यास मदत होते. अशाप्रकारच्या आळंबीचे प्रकार अ‍ॅमेझॅानच्या जंगलापासून उष्णकटिबंधीय प्रदेशात, आफ्रिका, अमेरिका व ऑस्ट्रेलियातील जंगलात आढळत असल्याचे समजते. या आळंबीचा प्रकार साधारण 25 सेंटीमीटरपर्यंत त्याची वाढ होत असल्याची माहिती मिळाली. या आळंबीचा सर्वात प्रथम शोध फ्रेंच वनस्पतीशास्त्र अभ्यासक एटीन पेअरी व्हेंटनट यांनी 1798 साली लावला असल्याची माहिती मिळाली.

याचबरोबर मानवी मेंदूप्रमाणे वेगळ्या प्रकारचा आळंबीचा प्रकार देखील येथील जंगलाच्या परिसरात आढळू लागला आहे. शास्त्रीय नावाप्रमाणे लरर्श्रींरींळर लीरपळळषेीाळी थोडक्यात ब्रेन पफबॉल असे संबोधले जाते. साधारण 6 ते 20 सेंटीमीटर पर्यंत या आळंबीचा प्रकार वाढत असतो. जमिनीवर वाढ होणार्‍या या आळंबीच्या प्रकाराचे नाव लॅटिन शब्द रुट म्हणजे क्रॅनियम असे संबोधले जाते. साधारण जनावराच्या मेंदूप्रमाणे ही आळंबी जशी जशी तिची वाढ होत जाते तसतसे तिचा रंगदेखील बदलताना दिसतो तसेच त्याला सुरकुत्या पडताना दिसतात. या आळंबीचा वापर चायना व जपानी औषधी घटकांमध्ये वापरण्यात येतो अशी माहिती विकीपिडीया वरून मिळत आहे. दोन्ही आळंबीचे प्रकार हे बुरशीजन्य प्रजातीमध्ये मोडणारी ही वनस्पती आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!