कोरोना योद्धा; डॉ. प्रसाद जोशींच्या लेखणीतून

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : कोरोना अर्थात कोविड १९ हा शब्द कानावर आला की मनात एक भीती उत्पन्न होते आणि तो कोरोना तुम्हाला झाला असेल तर. तर काही विचारूच नका. मी डॉक्टर या नात्यांनी या सर्व रुग्णांना खूप जवळून पाहिले आहे. कोणी एखादा व्यक्ती कोरोना पोसिटीव्ह आला की त्याच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या मनात दहशतच निर्माण होते “भित्या पोटी ब्रह्मरक्षस” ही म्हण सर्वार्थाने त्यावेळी खरी ठरते. माणूस जर कशाला घाबरत असेल तर ते स्वतःच्या मरणाला, तेव्हा स्वतःचे मरण त्याला समोर दिसायला लागते. पण मित्रांनो मला तुम्हाला असे सांगायचे आहे की कोरोना मूळे होणारा मृत्यूदर हा फक्त 3 ते 4 टक्के आहे म्हणजे १०० लोकांना कोरोना झाला असेल तर 3 किंवा 4 व्यक्तीच त्यामुळे दगावतात. मग आपण घाबरायचे कशाला आणि का ? कोरोनाची भीती नको पण काळजी घ्या हे नक्की.

जेव्हा एखादा रुग्ण कोरोना पोसिटीव्ह म्हणून ऍडमिट होतो तेव्हा त्याला “कोरोना केअर सेंटर” या प्रकारच्या हॉस्पिटल अस्थापनेत ठेवण्यात येते. तिथे त्यांची सर्वतोपरी उत्तम काळजी प्रशासन, डॉक्टर्स, परिचारिका आणि इतर स्टाफ घेत असतात. त्यांना दर 4 तासांनी तपासले जाते. एकदा ऍडमिट झाल्यानंतर काही दिवस हॉस्पिटल मध्ये रहावे लागते. ८० टक्के रुग्णांमध्ये टेस्ट जरी पॉझिटिव्ह आली असली तरीही कोरोनाची लक्षणं काहीच नसतात, अश्या लोकांना 3 दिवस त्या सेंटर ला ठेवून मग नंतर दुसऱ्या सेंटरला पाठवण्यात येते. तिथे त्यांना दर ८ तासांनी तपासले जाते व मग १० दिवस पूर्ण झाले की घरी सोडले जाते. अशा रुग्णांची मानसिक स्थिती उत्तम असणे गरजेचे आहे. त्यासाठी रुग्णांचे कौन्सिलिंग करून त्यांना व त्यांच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन ते लवकर बरे होतील याची त्यांना खात्री पटवून देणे फार गरजेचे आहे.

डॉक्टर या नात्याने  कोव्हीड हॉस्पिटल मध्ये “कोव्हीड योद्धा” म्हणून काम करणे काही सोपे नाही. ते पीपीई किट घालून एन ९५ चा मास्क घालूनच कोरोना पोसिटीव्ह रुग्णाला तपासायचे. त्या किट मध्ये स्वतःची  सुरवातीला प्रचंड घुसमट होते. हवा यायला कोठूनही वाव नसतो. नाहीतर कोरोना नाही का शिरणार ! 5 ते 6 तास काम करून अंग आतून पूर्ण ओलेचिंब भिजलेले असते. तिथे घामगाळणे म्हणजे काय याची उगाचच प्रचिती येते. डॉक्टर हे अजून तरी नोबेल प्रोफेशन आहे असे समजले जाते. आणि ते आहे पण. त्यामुळे रुग्णांची सेवा करणे आणि तो लवकर कसा बरा होईल याकडेच आम्हा सर्व डॉक्टरांचे लक्ष असते. सर्व नर्सिंग स्टाफ, वॉर्ड बॉयस, मामा, मावश्या, स्वीपर्स हे आवर्जून हॉस्पिटलचे वातावरण कसे स्वच्छ राहील याकडे जातींनी लक्ष देत असतात. एकूणच या कोरोना विषाणू नि सर्वांना पुरता आपल्या विळख्यात घेतला आहे. कम्युनिटी स्प्रेड सुरू झाला आहे, असे काही तज्ज्ञांचे मत आहे आणि तसे असेल तर आगामी काळात आपल्याला फार सतर्क राहावे लागणार आहे.

सर्व समाजाला माझी डॉक्टर या नात्याने कळकळीची विनंती आहे की, शक्यतो घराबाहेर पडू नका, पडलात तर मास्क घालून बाहेर जा, लोकांपासून कमीत कमी 1 मीटर चे अंतर ठेवा, वरचेवर सॅनिटायझरचा वापर करा आणि घरातील आपल्या वयस्कर माणसांना आणि लहान मुलांना जपा. WHO च्या सांगण्या वरून हा विषाणू आपल्या बरोबर अजून बराच काळ राहणार आहे आणि तो आपणहून घरात येत नाही, त्याला आपणचं घरात आणतो हे समजून घेणे फार गरजेचे आहे. परत एकदा सांगतो भीती नको काळजी घ्या, अफवांवर विश्वास ठेवू नका, सकारात्मक वृत्ती ठेवा, प्रत्येकांनी प्रत्येकाला लागेल ती मदत करा आणि सगळ्यात महत्वाचे चुकून जर कोरोना झालाच तर घाबरून जाऊ नका. कोरोना आजारा पेक्षा तो झाला आहे ह्या भीती नेच खचून माणसे दगावली आहेत.

जाता जाता एवढेच सांगीन 

“हे ही दिवस जातील,

चांगले दिवस पुन्हा येतील,

लक्षात ठेवा गाड्यांनो,

आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार “

– डॉ प्रसाद जोशी,

अस्थीरोग शल्यचिकित्सक

जोशी हॉस्पिटल, फलटण


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!