कोरोना व्हॅक्सीन : ‘रेमडेसिवीर औषधाचा काळाबाजार आणि गरीबांचे मृत्यू थांबवा’, देवेंद्र फडणवीस यांचे उद्धव ठाकरेंना पत्र


 


स्थैर्य, मुंबई, दि.२: कोरोना काळात रेमडेसिवीरची प्रचंड टंचाई निर्माण झाली असून, त्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहेत. त्यामुळे गरिब रूग्णांचे अतोनात हाल होत असून, त्यांचे मृत्यू होत असल्याची टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. यासंबंधी त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्रही लिहिले आहे. पत्रात देवेंद्र फडणवीसांनी लिहले की, ‘राज्यात दररोज सरासरी 20 हजार कोरोना रुग्णांची भर पडत आहे. दररोज सरासरी 450 ने मृतांची संख्या वाढतं आहे. अशात रेमडेसिवीर हे उपचारातील एक महत्वाचे औषध असल्याने, त्याचा पुरवठा सुरळीत राहील आणि हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे. पण, अनेक जिल्ह्यांमध्ये त्याची उपलब्धता नसल्याने गरीब रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. राज्य सरकार उपलब्धतेचे कितीही दावे करत असले तरी रूग्णालयांकडून मात्र टंचाईचे कारण दिले जात आहे. त्यामुळे रुग्णालयांकडून रूग्णांना थेट केमिस्टकडे ते खरेदी करण्यासाठी जाण्यास सांगितले जाते. याची किंमत लक्षात घेता, ते सामान्यांच्या आवाक्यात नाही. परिणामी त्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे.’

‘रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी राज्य सरकारने मध्यंतरी प्रक्रिया राबवली होती. पण ती प्रक्रिया सदोष असल्याने अनेक जिल्ह्यातून खरेदी केलेला औषध साठा परत करावा लागला, असे वृत्त माध्यमांमध्ये आले. खरेदी योग्य झाली नसल्याने याच्या उपलब्धतेचा गुंता आणखी वाढला. यामुळे रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू झाला. यामुळे गरीबांचे सर्वाधिक हाल होत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अनेकांनी तर याचा गोरखधंदा सुरू केला आहे. एकिकडे गरीब रूग्णांचे मृत्यू आणि दुसरीकडे रेमडेसिवीरची काळाबाजारी ही स्थिती अतिशय गंभीर आहे. त्यामुळे नवीन खरेदी प्रक्रिया राबवून जिल्हा प्रशासनांना हा साठा तातडीनं उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी पत्राद्वारे केली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!