मार्चपर्यंत कोरोना लस उपलब्ध; सिरम इन्स्टिट्यूटचा अंदाज

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, पुणे, दि.१७: जर सर्वकाही योग्य दिशेने राहिले तर भारताला मार्च २०२१ पर्यंत कोरोनावरील लस मिळू शकणार आहे. जगातील सर्वात मोठी लस निर्माता कंपनी सिरम इन्स्टिट्यूटच्या अधिका-याने याबाबत माहिती दिली आहे. कंपनीकडून देशभरात ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझिनेका कंपननीच्या कोरोना लसीची ट्रायल घेतली जात आहे.

सिरम इन्स्टिट्यूट (एसआयआय) चे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव यांनी ही माहिती दिली आहे. भारताला मार्च 2021 पर्यंत कोरोना लस मिळू शकते. प्रशासनाने जर लवकर मंजुरी दिली तर ते शक्य आहे. अनेक कंपन्या या लसीवर काम करत आहेत. भारतात हे संशोधन वेगाने सुरु आहे. देशात दोन कोरोना लसींची तिस-या टप्प्यातील चाचणी सुरु आहे. तर एका लसीची दुस-या टप्प्यातील चाचणी सुरु आहे. तसेच अन्य कंपन्याही लसीवर संशोधन करत आहेत, असे ते म्हणाले.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य संशोधक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांच्या माहितीनुसार पुढील वर्षाच्या दुस-या तिमाहीपर्यंत कोरोना लस तयार व्हायला हवी. कोणत्याही लसीच्या चाचणीमध्ये उतार चढाव येतात. जानेवारी 2021 पर्यंत आम्ही अंतिम चाचण्यांचे अहवाल पाहू. त्यामुळे दुस-या तिमाहीपर्यंतच सार्स-कोव्ह-२ विरोधात लस तयार व्हायला हवी, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

डॉ. जाधव यांनी इंडिया व्हॅक्सिन अव्हेलॅबिलीटी ई समीटला संबोधित करताना सांगितले की, आम्ही दर वर्षी 70 ते 80 कोटी डोस बनवू शकतो. देशाची 55 टक्के लोकसंख्या ही 50 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. मात्र, उपलब्धता आणि रिस्कच्या आधारावर आधी ही लस आरोग्य कर्मचा-यांना दिली जावी. यानंतर इतरांना. आम्ही डिसेंबर 2020 पर्यंत 6 ते 7 कोटी डोस तयार करत आहोत. मात्र, लायसन मिळाल्यानंतरच ही लस बाजारात येईल. यानंतर आम्ही सरकारच्या संमतीने आणखी डोस तयार करू.

वयोगटानुसार कोरोना लसींना मंजुरी


दरम्यान कोरोना लसीच्या वितरणाबाबत सरकारने तयारी सुरु केली असून एकापेक्षा जास्त कोरोना लसींना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. भारतात ज्या लसींची चाचणी सुरु आहे, त्या डबल किंवा ट्रिपल डोसच्या लसी आहेत. संशोधकांनुसार एका डोसच्या लसीपेक्षा दोन किंवा तीन डोसच्या लसी जास्त परिणामकारक आहेत. यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले की, वयोगटानुसार परिणामकार असलेल्या वेगवेगळ्या लसींना मंजुरी दिली जाऊ शकते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!