
स्थैर्य, फलटण : कोरोनाचे नवे रुग्ण शोधण्यासाठी फलटण शहरासह तालुक्यात कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आलेल्या आहेत. त्याकरिता स्वॅब कलेक्शन सेंटर, खासगी रुग्णालय वाढविण्यात आले. फलटण मध्ये उपजिल्हा रुग्णालय येथे व काही खाजगी हॉस्पिटल येथे स्वॅब क्लेक्शन सेंटर उभारले गेले आहे. मात्र, अजूनही अपेक्षित वेळेत रिपोर्ट येत नाही. त्यामुळे रुग्ण आणि कुटुंबियांचे हाल होत आहे.
फलटण शहरात गेल्या काही महिन्यांपासून सतत रुग्ण संख्येत वाढ होत आहे. दिवसाला पन्नास हुन अधिक नवे रुग्ण सापडत आहे. तसेच अत्यवस्थ रुग्णही वाढत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून ज्याठिकाणी रुग्ण सापडतील त्याच्या संपर्कातील रुग्ण शोधून काढणे पाॅझिटिव्ह असलेल्या रुग्णांचे विलगकरण करणे यावर प्रशासनाने भर दिला आहे. त्यासाठी खासगी आणि सरकारी रुग्णालय आणि आरोग्य केंद्राच्या पातळीवर स्वॅब क्लेक्शन सेंटर सुरू केले असून रॅपिड टेस्ट आणि आरटीपीसीआर टेस्ट सुरू केली आहे.
आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट चोवीस तासात येणे अपेक्षित असते. तोपर्यंतच रुग्णाचे विलीगीकरण करणे बंधनकारक आहे. मात्र, आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट येण्यास तीन ते चार दिवसाचा कालावधी लागत आहे. त्या कालावधीत संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. म्हणून गेल्या काही दिवसांमध्ये थोड्या प्रमाणात कमी झालेला कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.
फलटणचे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप म्हणाले कि, `एकदा स्वॅब घेतल्यानंतर त्या व्यक्तीचा रिपोर्ट वेळेत देण्याचा सूचना केल्या आहेत. तसेच संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तीचेही चाचणी केली जाते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू असून चाचणीचा रिपोर्ट वेळेत आला. तर वेळेत उपचार सुरू होतील आणि कोरोनाचा संसर्ग कमी होईल.’