स्थैर्य, फलटण, दि.२३: फलटण तालुक्यातील जिंती गावामध्ये कोरोना प्रादुर्भाव मंदावला असतानाच दुसरीकडे मात्र डेंग्यने शिरकाव केला आहे. गेल्या पंधरा दिवसांत डेंग्यूचे वीस रुग्ण आढळल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिंती गावामध्ये कोरोनाचे रुग्ण बर्यापैकी कमी झाल्यामुळे नागरिकांमधील याविषयीची दहशतही काही प्रमाणात कमी झाली आहे. पण पावसाळ्याला सुरुवात होताच डेंग्युचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. गावामध्ये डेंग्यू बाधित रुग्णांची एकुण संख्या वीस झाली असून यातील पाच रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर एक रुग्ण बारामती येथे उपचारासाठी दाखल आहे. अशा परिस्थितीत गावात ग्रामपंचायतीच्यावतीने योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असून लेखी तक्रार ग्रामपंचायतमध्ये करा नंतर योग्य पद्धतीने उपाययोजना केली जाईल असे ग्रामपंचायततुन नागरिकांना उत्तर दिले जात असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.
‘‘डेंग्यू रुग्ण सापडल्यानंतर दोन ते तीन वेळा औषध फवारणी केली. मात्र इतर कोणतीही खबरदारी घेतली जात नसून तुमच्याकडुन सांडपाणी साठले जाते, अशी उत्तरे ग्रामपंचायतीकडून दिली जात आहेत. आमच्याकडून ग्रामपंचायत कराची वसुली करते मात्र उपाययोजना करताना तुम्ही फॉरेस्टच्या जागेत रहात असल्याचे सांगून कामे करणे टाळळे जाते.’’
– संगिता वाघमारे, महिला ग्रामस्थ, जिंती, ता.फलटण.