स्थैर्य, मुंबई, दि. १२ : राज्यातील आणि विशेषतः मुंबईतील करोना प्रसार अजूनही थांबलेला नाही. शनिवारी राज्यात आतापर्यंतच्या उच्चांकी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. दिवसेंदिवस राज्यातील करोना बाधितांचा आकडा वाढत असताना राजभवनातील जवळपास १८ जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. या कर्मचाऱ्यांनी करोनाची चाचणी केली होती. या चाचणी अहवाल मिळाल्यानंतर ते करोना पॉझिटिव्ह निघाले.
राजभवनातील जवळपास १८ कर्मचारी करोना पॉझिटिव्ह असल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. राज्यपालांचे कार्यालय व निवासस्थान असलेल्या राजभवनातील कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करण्यात आली होती. यापैकी १८ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. या कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं चाचणी करण्यात आली आहे.
राज्यात रुग्णसंख्येची उच्चांकी नोंद
राज्यात एकीकडे सर्व व्यवहार पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न होत असताना करोनाचा प्रसार आणि रुग्णसंख्या मात्र वेगान वाढताना दिसत आहे. शनिवारी राज्यात आतापर्यंतची दिवसभरातील सर्वात मोठ्या रुग्णसंख्या वाढीची नोंद झाली. महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ८ हजार १३९ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २२३ मृत्यू मागील चोवीस तासांमध्ये नोंदवले गेले आहेत. या संख्येमुळे महाराष्ट्रातील करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १० हजार ११६ इतकी झाली आहे. मागील २४ तासांमध्ये ४ हजार ३६० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या २ लाख ४६ हजार ६०० इतकी झाली आहे. यापैकी १ लाख ३६ हजार ९८५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात सध्याच्या घडीला ९९ हजार २०२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.