स्थैर्य, महाबळेश्वर, दि. 2 : रांजणवाडी पोठोपाठ आता शहराची दाट लोकवस्ती असलेल्या गवळी आळी जवळ असलेल्या पालिका कर्मचार्यांच्या सोसायटीत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. शहरातील प्रमुख अधिकार्यांनी या भागाची पाहणी करून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता 108 झाली आहे.
महाबळेश्वर शहर हे आजपर्यंत कोरोना मुक्त शहर म्हणून ओळखले जात होते. शहरापासून दोन कि.मी. अंतरावर असलेल्या रांजणवाडी भागात काही कोरोना रुग्ण आढळून आले; परंतु प्रत्यक्ष शहरात आजपर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नव्हता. परंतु रविवारी शहराच्या दाट लोकवस्ती असलेल्या गवळी आळी शेजारील पालिका कर्मचार्यांच्या सोसायटीमधील एका महिलेला कोरोनाची बाधा झाली. सातारा येथे उपचारासाठी गेल्या नंतर तेथे त्यांची रॅपिड अँटिजेन कोरोना चाचणी घेण्यात आली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोना रुग्ण ज्या सोसायटीमध्ये आढळला त्या परिसराची पाहणी तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी भोरे-पाटील व पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी व महसूल पालिका व पोलीस कर्मचार्यांचे पथक उपस्थित होते.
या भागातील उपनगराध्यक्ष अफजल सुतार व माजी नगराध्यक्ष युसूफ शेख यांच्याबरोबर अधिकार्यांनी चर्चा केली तसेच ज्या कुटुंबात कोरोना रुग्ण आढळला त्या कुटुंबाशी देखील अधिकार्यांनी चर्चा करून खबरदारीच्या सूचना केल्या. नगरपालिका कर्मचारी सोसायटीचा काही भाग सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला. या भागात पालिकेच्यावतीने पुढील चौदा दिवस नाकाबंदी करण्यात येणार आहे.
महाबळेश्वर प्रमाणेच रविवारी पाचगणी येथेही पाच कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. या कोरोना रुग्णांमुळे महाबळेश्वर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता 108 झाली आहे. या पैकी 44 रुग्णांवर महाबळेश्वर व पाचगणी येथील कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ महाबळेश्वर तालुक्यातील 61 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून तीन रुग्णांचे निधन झाले आहे. प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या गोडवली येथे आज स्थानिकांसाठी रॅपिड अँटिजेन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांची तपासणी करण्यात येणार आहे तसेच महाबळेश्वर येथील सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या भागातील नागरिकांच्या आरोग्याची तपासणीची मोहीम पालिकेच्या वतीने हाती घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली. रांजणवाडी येथील काही नागरिकांच्या रॅपिड अँटिजेन तपासणी बाकी आहे. या टेस्टही लवकरच घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.