स्थैर्य, पाटण, दि. २५ : पाटण तालुक्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सर्वच क्षेत्रास आर्थिक फटका सहन करावा लागला. त्यात रोजच्या कमाईवर कुटुंबाची जबाबदारी पेलणार्या रिक्षा व्यावसायिकांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. लॉकडाउन काळात सर्वच बंद होते आणि सध्या अनलॉकमध्ये प्रवासी अजूनही रिक्षात बसण्यासाठी तयार नाहीत. लॉकडाउन काळात ठप्प झालेला रिक्षा व्यवसाय अनलॉकनंतरही सुरू झालेला नाही. त्यामुळे तालुक्यातील हजारो रिक्षा व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.
पाटण तालुक्यातील हजारो शिक्षित आणि अशिक्षित तरुण नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आणि कुटुंबाच्या जबाबदारीकरता रिक्षा व्यवसायात उतरला. या व्यवसायात उतरताना काही तरुणांनी बँक आणि पतसंस्थांकडून कर्ज घेऊन रिक्षा व्यवसाय सुरू केला. यातून होणार्या कमाईतून कर्जाचे हप्ते आणि त्यातून राहिलेल्या रकमेतून संसार करायचा असा त्यांचा दिनक्रम सुरू आहे. मात्र लॉकडाऊन काळात पूर्ण व्यवसाय बंद होता. तरी देखील केलेल्या बचतीवर काही महिने उदरनिर्वाह केला. आता अनलॉकनंतर या व्यवसायाला गती मिळेल असे वाटले होते, पण अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने पाटण शहरातील आणि तालुक्यातील प्रवासी रिक्षातून प्रवास करायला तयार नाहीत. त्यामुळे कर्ज काढून या व्यवसायात उतरलेल्या तरुण युवकांच्या कुटुंबाच्या जबाबदारीबरोबर बँकेच्या कर्जाचे हप्ते कसे भरायचे हे संकट समोर उभे राहिले आहे. व्यवसाय अजून पूर्ण क्षमतेने सुरू नाही. मग हप्ते कुठून भरायचे, घर कसे चालवायचे असे अनेक प्रश्न रिक्षा चालकांच्या समोर उभे राहिले आहेत.
पाटण हे तालुक्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी शासकीय कामांसाठी लोक ये-जा करतात. मात्र अजूनही ग्रामीण भागातून कामासाठी लोक बाहेर पडत नाहीत. जे पडत आहेत ते स्वत:च्या दुचाकी वा चारचाकीचा वापर करत आहेत. त्यामुळे शहरात रिक्षाला प्रवासी मिळत नाहीत. परिणामी रिक्षा व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे कोरोना कधी जाणार आणि आम्हाला सुखाचे दिवस कधी येणार या विवंचनेत तालुक्यातील रिक्षा चालक सापडला आहे.