लॉक डाऊन आणि कोरोनाच्या वाढत्या समस्येमुळे सर्व उद्योगधंदे अडचणीत: वेळेचा सदुपयोग, युवावर्ग शेतात राबतोय
स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक,दि.२३(रणजित लेंभे) : जिल्हयात कोरोनाचा संसर्ग आणि त्याचा प्रभाव वाढत चालला आहे. गेल्या चार महीन्यात लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग व्यवसाय अडचणीत आले. शेतकऱ्यांच्या मालाला किंमत नाही. जनजीवन ठप्प झाल्यामुळे शहरांतील लोकांचे गावाकडे येण्याचे अधिक प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागातील युवा वर्गाला हाताला काम नसल्यामुळे, वेळेचा सदुपयोग म्हणून शेतातील हंगामी पीक आणि नवनवीन शेतात प्रयोग करुन शेतात राबताना व लक्ष केंद्रीत केल्याचे चित्र दिसत आहेत.
चार-पाच दशकांपूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी अशी गांव खेळ्यात अवस्था होती. मात्र अलीकडच्या काळात निसर्गाचा लहरीपण, नव्वदच्या दशका नंतर सरकारचे शेतकरी विषयाचे धोरण, मजुरांचा अभाव व वाढते दर, शेतीच्या मालाला खर्चाच्या तुलनेत कमी हमीभाव, व्यापाऱ्यांकडून होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक,नव्या पिढीचा शेतीत कष्ट करण्याची मानसिकता व बघण्याचा दृष्टिकोन आणि पाण्याची शाश्वता आदी बाबींमुळे शेती व्यवसाय तोट्यात आला. परिणामी युवा पिढीचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि खेड्यातील बेरोजगार तरुणांनी कामधंदा आणि नोकरीसाठी शहराची वाट धरली. मात्र गेल्या चार पाच महिन्यात जागतिक व देशपातळीवर कोरोनाचे आर्थिक महासंकट आलं. या स्पर्धेच्या व धावपळीच्या युगातील लोकांचे चक्र थांबवले, लोकांना दोन पैसे मिळवून देणारी साधन रोडावली. मात्र अशा प्रतिकूल परस्थितीत सर्व जग थांबले असतांना मात्र शेतीची कामे सुरु आहेत. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला शेतीच ही तारु शकते हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. या उन्हाळ्यात अनेक शेतकऱ्यांनी बांध नवसारने, पडीक जमीन वहिवाट, जमिनीची लेव्हलिंग व शेतात शेणखत व इतर खत टाकणे, पाईपलाईन, बांधवर अनावश्यक झाडझुडपं काढून, शेतातील मशागत या कामावर प्रचंड भर देण्यांत आला. लॉकडाऊन काही पिछा सोडत नसल्यामुळे व सध्या सगळे उद्योगधंदे बंद असल्यामुळे अनेक तरुणांनी शेतीत काम करणाऱ्या घरच्यांना हातभार व मदत करतांना दिसत आहेत. सध्या परिसरात खरिपातील घेवडा, वाटाणा, सोयाबीन तर बागायती पिंकामध्ये ऊस, आले बटाटा याची लागवड क्षेत्रात अधिक वाढ झाली आहे. एक महिन्याच्या आसपास असणाऱ्या घेवडा पीकातील तण व गवत काढण्यासाठी कोळपणी, भांगलणी बरोबर कीटक, तणनाशकावर औषध फवारणीला वेग सुरु आहे. तर अधिक उत्पादनासाठी वातावरणातील बदला प्रमाणे टॉनिक, इतर जैविक, रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा डोस दिला जात आहे. या कामांमध्ये युवावर्ग मग्न झाला आहे. कोरोनाने शेतीची वाट दाखवली असली तरी शेतकऱ्यांच्या कष्टाच्या बळावर आपण सर्वजण सर्वकामे, उद्योग व्यवसाय बंद असतांना दोन वेळेचं पोटभर अन्न खातो, देशांतील अर्ध्याहून अधिक लोक आपल्या शेतात राबत आहेत. अनेकांना शेतातूनच रोजगार उपलब्ध होत आहे. अनेक लहान मोठ्या उद्योगधंद्याना मालाचा पुरवठा शेतातूनच होत आहे. यावरून देशाच्या आर्थिक विकासदरात शेतीचा सुध्दा वाटा असल्याचे अधोरेखित होत आहे. मात्र शेतकरी व तरुणवर्ग शेतात रमत व मेहनत घेत असला तरी, शासनाने शेतकऱ्यांच्या शेत मालाला हमीभाव दिला पाहिजे, शेतीपुरक व्यवसायांना चालना दिली पाहिजे. शेतीला आवश्यक व आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्याच्या मार्गदर्शक भूमिके बरोबर विविध योजनाच्या सहाय्याने शेतकऱ्यांना मदतीचा हातभार दिला पाहिजे.