स्थैर्य, सातारा, दि. 3 : सातारा शहरातील दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज सातारा नगरपालिकेतील कोरोना कक्षात काम करणार्या महिला अधिकार्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबतची माहिती मिळताच सातारा पालिकेत सॅनिटाइजची फवारणी करून पालिका सील करण्यात आली आहे. याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की गेल्या वर्षी सातारा नगरपालिकेत मुंबई येथील मंत्रालयातून इंजिनियर आणि क्लार्क यांची नेमणूक झाली होती. त्यामध्ये एका महिला अधिकार्याचा समावेश होता. ही महिला अधिकारी गेल्या तीन महिन्यांपासून सातारा नगरपालिकेत कोरोना विभागात कार्यरत होती. कामानिमित्त खावली येथील क्वारंन्टाइन केलेल्या व्यक्तींच्या संपर्कात ती आली होती.
दरम्यान व्यक्तिगत कामानिमित्त तिला रजेवर जायचे होते, तशी कल्पना तिने पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांना दिल्यानंतर शासनाच्या नियमानुसार रजेवर जाण्यापूर्वी मेडिकल सर्टिफिकेट आणण्याची सूचना तिला करण्यात आली होती. सातारा येथील जिल्हा रुग्णालयात काल संध्याकाळी ती मेडिकल सर्टिफिकेट आणण्यासाठी गेली असता तिचे स्वॅब घेण्यात आले. त्यामध्ये तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या घटनेची माहिती मिळताच सातारा पालिकेतील आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांनी संपूर्ण पालिका सॅनिटाइज करून घेतली असून खबरदारीचा उपाय म्हणून सातारा नगरपालिका सील करण्यात आली आहे. दरम्यान, संबंधित महिला अधिकार्यांच्या संपर्कात कोण, कोण आले होते याची माहिती आरोग्य विभाग घेत आहे.