दैनिक स्थैर्य । दि. २५ जुन २०२१ । सातारा । आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सहकार्याने आणि रुद्रनिल सोशल फाऊंडेशनच्या वतीने ग्रामस्थांच्या मागणीनुसार शेंद्रे ता. सातारा येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे.
शेंद्रे येथील ग्रामस्थांना लसीकरणासाठी कुमठे आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्र भरतगाववाडी असे १५ कि.मी.चे अंतरावर जावे लागत होते. गावातील नागरीकांना विशेषत: वयोवृध्द नागरीकांना हे खूपच त्रासदायक होत असे. मोठया लोकसंख्येचे गाव व ग्रामस्थांना होणारा त्रास विचारात घेवून शेंद्रे येथे लसीकरण मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने रूदनिल सोशल फौंडेशनचे ओंकार सुरेश कदम यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे केली होती. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पत्र देऊन शेंद्रे येथे लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या होत्या.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सूचनेनुसार आरोग्य विभागामार्फत शेंद्रे येथील प्राथमिक शाळेत लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले असून त्याचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.