स्थैर्य, फलटण, दि. २४ : करोना वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजना अधिक प्रभावीरीतीने राबविण्यासाठी कार्यरत असलेले पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी उद्या रविवार दि. २४ रोजी सकाळी ९.३० वाजता प्रियदर्शनी श्रीमती इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन, फलटण येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती गटविकास अधिकारी अमिता गावडे यांनी दिली आहे.
या कार्यशाळेसाठी तालुक्यातील सर्व सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी तसेच नगर परिषद अधिकारी कर्मचारी यांना निमंत्रित करण्यात आले असून त्यांना करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या विविध उपाय योजनांबाबत सविस्तर माहिती देण्याबरोबर त्यांच्या काही सूचना/अडचणी असतील तर त्या जाणून घेऊन योग्य मार्ग काढण्यात येणार आहे.
कोणत्याही परिस्थितीत फलटण शहर व तालुक्यात वाढणार नाही, यासाठी आतापर्यंत जपलेली एकजुट यापुढे अधिक भक्कम करुन करोनावर मात करण्यासाठी लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासन यांची खंबीर एकजुट व त्याला लोकांची साथ असे गेले २ महिने जुळलेले सूत्र यापुढे अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न आहेच, त्याच बरोबर या कार्यशाळेच्या माध्यमातून प्रत्यक्ष कार्यरत असणाऱ्या लोकांच्या समस्या समजावून घेऊन सर्व नियम/निकषांची अमलबजावणी अधिक प्रभावीरीतीने करण्याचा प्रयत्न या कार्यशाळेद्वारे करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी सांगितले आहे.
कार्यशाळेत प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, उप विभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, प्रभारी तहसीलदार आर. सी. पाटील, गटविकास अधिकारी अमिता गावडे, नगर परिषद मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांचे मार्गदर्शन होणार आहे.