कोळकीत कोरोना रुग्ण वाढत आहेत; कोरोनाबाबत गहाळ राहू नका : प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १० जुलै २०२१ । फलटण । फलटण तालुक्यातील अनेक गावांत कोरोनाने रूग्ण आता पुन्हा मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. फलटणचे उपनगर समजले जाणार्या कोळकीमध्ये कोरोनाने पुन्हा आपले हात पाय पसरायला सुरवात केलेली दिसुन येत आहे. कोळकी गावामध्ये किमान दहा ते पंधरा कोरोना संशयीताचे अहवाल हे कोरोनाबाधित झाल्याचे येत आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णांना तातडीने विलगीकरण कक्षात दाखल करणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांपासुन मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत असून कोळकी गावासह पंचक्रोशीमध्ये दररोज कोरोना बाधितांची आकडेवारी वाढत आहे. त्यामुळे येणार्या काळामध्ये ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. कोरोनाला आपल्या गावापासून हद्दपार करण्यासाठी पुन्हा एकदा सर्वांनी एकत्र येवून काम करण्याची गरज आहे. तरी कोरोनाच्या बाबतीत कोणीही गहाळ राहू नये, असे निर्देश फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी दिले.

कोळकी ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये कोरोना दक्षता समीतीची बैठक बोलवण्यात आलेली होती. त्यावेळी प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप बोलत होते. या वेळी फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे – पवार, कोळकीच्या सरपंच सौ. विजया नाळे, उपसरपंच संजय कामठे, तलाठी सचिन क्षिरसागर, प्रभारी ग्रामविस्तार अधिकारी दडस यांच्यासह कोळकी ग्रामपंचायत सदस्य व कोरोना दक्षता समितीचे सदस्य उपस्थित होते.

कोरोनाबाधित रुग्णांच्या हाय रिस्क संपर्कातील व्यक्तींच्या तपासण्या वाढवणे गरजेचे आहे. त्यांची तपासणी झाल्यावर त्यांना लगेचच विलीगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात यावे. कोळकीमध्ये कोरोनाबाधित असला तरीही तो काही वेळा फिरतना दिसत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून जर कोरोनाबाधित रूग्ण ग्रामपंचायत प्रशासनाचे ऐकत नसेल तर त्याला पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने विलीगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात यावे. कोरोनाच्या बाबतीमध्ये आता कोणीही गहाळ राहून चालणार नाही. कोरोनाच्या दुसरी लाट ओसरत आहे असे चित्र दिसत असताना पुन्हा रूग्णसंख्या वाढणे हे धोक्याचे आहे. जर कोरोनाला कोळकी गावामधुन हद्दपार करायचे असेल तर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे, असेही प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी स्पष्ट केले.

फलटण – शिंगणापूर व फलटण – दहीवडी रोडवर कोळकी गावाच्या हद्दीमध्ये बहुतांश व्यावसायिक कॉम्प्लेक्स आहेत. या ठिकाणी सुध्दा शासनाने निर्देशीत केलेल्या नियमांचे पालन काटेकोरपणे करताना दिसुन येत नाही. प्रत्येक वेळी महसुल किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून कारवाई करणे शक्य नाही. तरी कोळकी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोळकीमध्ये नियम न पाळणाऱ्यांवर दररोज कारवाई करण्यात यावी. जर तेथील व्यावसायिक सहकार्य करित नसतील तर पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने कोळकी ग्रामपंचायतीने अश्या सर्वांवर कारवाई करावी, असे आदेश सुध्दा प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी दिले.

कोळकी गावामध्ये कोरोनाचे रूग्ण पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. कोळकी गावामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तातडीने उपाययोजना करून कोरोनाला गावातुन हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. कोळकी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असणार्या सर्व व्यावसायिकांची प्रत्येक पंधरा दिवसांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्या प्रमाणे त्याची अंमलबजावणी होताना दिसुन येत नाही. कोळकी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असणार्या सर्व व्यावसायिकांची कोरोना चाचणी दर पंधरा दिवसांनी करण्यात यावी, असे निर्देश फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे – पवार यांनी दिल्या.

कोळकी गावातील नागरिकांचे व व्यावसायिकांचे जलत गतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी विशेष कोळकीसाठी मोठ्या प्रमाणावर कोरोना लसींचे डोस उपलब्ध होत नाहीत. तरी कोळकीसाठी कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणी कोळकी ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजय कामठे यांनी यावेळी प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप व गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे – पवार यांच्याकडे केली.


Back to top button
Don`t copy text!