स्थैर्य, सातारा दि 24 : कोरोना जागतिक महामारीने सर्व संदर्भ बदलून गेले आहेत. नियमित काळजी घेणाऱ्या काहींनी आता आपल्या दुचाकी -चारचाकी वाहनांची घरच्याघरी व सर्व्हिसिंग सेंटर मध्ये नियमितपणे स्वच्छता ठेवण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या साडे बत्तीस हजारापर्यंत पोहचली असली तरी सुमारे बावीस हजार लोकांनी कोरोना वर मात करून आपल्या जिद्धीने दर्शन घडविले आहे. या मध्ये आरोग्य सेवेने मोलाचा वाटा उचलला आहे. ही आशादायक परिस्थिती लक्षात घेऊन अनेक जण एकमेकांना दिलासा देत आहेत.
हलगर्जीपणा होऊ नये यासाठी शक्य ती खबरदारी घेतली तर कोरोनाचा शिरकाव होणार नाही. हे सूर्यप्रकाश इतके स्वच्छ आहे. त्यामुळे आता नियमितपणे दुचाकी -चारचाकी वाहनांतून आवश्यकता म्हणून प्रवास करणारे सर्व घटक आपापल्या वाहनांची काळजीपूर्वक देखभाल दुरुस्ती सोबतच वाहनांची स्वच्छता करण्यास प्राधान्यक्रम देऊ लागले आहेत.
लॉक डाउन नंतर मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ वाढली आहे. अशा वेळी वाहन तळे किंवा शासकीय व खाजगी आवारात वाहन बऱ्याच वेळा उभी करावी लागतात. अनेकांचा कळत नकळत वाहनाला स्पर्श होऊ शकतो. त्यामुळे त्या वर फडके मारून, निर्जंतुकीकरण फवारे मारूनच वाहन सुरू करतात. सध्या हवामानात बदल झाल्याने पाऊस दमदारपणे कोसळत आहे. तसेच रस्त्याच्या दुरावस्थेने रस्त्यावर सांडपाणी व चिखल झाला आहे. अशा बिकट परिस्थिती वाहनांची स्वच्छता राखण्यासाठी काही वाहन चालक स्वतः वाहनाची स्वच्छता घरच्याघरी करीत आहे. काही जण नियमितपणे खाजगी सर्व्हिसिंग सेंटर मध्ये जाऊन वाहनांची देखभाल करीत आहेत. सर्व्हिसिंग सेंटर मधील वाहनांची संख्या वाढली असून वाहन धुवून घेण्यात धन्यता मानली जात आहे. बऱ्यापैकी व्यवसायात वाढ होत असल्याची माहिती डिलक्स ऑटो सर्व्हिसिंग सेन्टरचे विकास घोरपडे यांच्या सारख्या मिस्त्रीने दिली आहे. गेली पंधरा वर्षे ते या व्यवसायात आहेत. कोरोनाचे संकट ओळखून दुचाकी वाहनाचे निर्जंतुकीकरण करूनच वाहने धुतली जातात. ग्रामीण भागातील शेतकरी व वाहन चालक यांच्या चाकाला चिकटलेली माती ही एका बाजूला काढून घेतल्यास त्याचा उपयोग नैसर्गीक खत म्हणून करतो. असे ही घोरपडे यांनी दावा केला आहे. कोरोना मुळे वैद्यकीय क्षेत्रातील तपासणी यंत्र, औषध तसेच मास्क,ऑक्सिजन सिलेंडर उत्पादकांचा व्यवसाय वाढला असताना वाहनांची स्वच्छता राखण्यासाठी सातारा जिल्ह्यातील ऑटो सर्व्हिसिंग सेन्टरचे काम वाढले आहे. मास्क व निर्जंतुकीकरण औषध वापरूनच वाहने धुतले जाते. यासाठी अतिरिक्त दर आकारणी करीत नाही असे ही स्पष्ट केले आहे.