स्थैर्य, मुंबई, दि.7: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याबरोबरच रुग्णांना लागणाऱ्या वैद्यकीय प्राणवायूला (ऑक्सिजन) देखील मागणी वाढत आहे. याची तातडीने दखल घेऊन साथरोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचा वापर करीत वैद्यकीय प्राणवायू उत्पादन करणाऱ्यांना वैद्यकीय क्षेत्रासाठी ८० टक्के आणि उद्योगांसाठी २० टक्के प्राणवायू देण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी डिसेंबर २०२० पर्यंत राज्यात लागू राहणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
यापूर्वी उद्योग क्षेत्रासाठी ५० ते ६० टक्के आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी ४० ते ५० टक्के प्राणवायूचा पुरवठा केला जायचा आता मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यात कायद्यान्वये बदल करून पुरवठ्याचे प्रमाण ८० टक्के वैद्यकीय क्षेत्रासाठी तर २० टक्के उद्योगांसाठी असे करण्यात आले. यामुळे रुग्णांना प्राणवायूची कमतरता भासणार नाही, अशी दक्षता घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.