स्थैर्य, वाई, दि. 24 : वाई पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार गजानन हणमंत ननावरे (वय 51) यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला.
मागील आठवड्यात वाई पोलीस ठाण्यातील 16 कर्मचारी कोरोना बाधित झाले होते. यातील अनेक कर्मचार्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. मात्र, यातील पोलीस हवालदार गजानन हणमंत ननावरे यांना मधुमेह व हृदयविकाराचा त्रासही होता. उपचारा दरम्यान पक्षाघाताचा (पॅरालिसिस) चा झटका आला होता. त्यामुळे त्यांना पुणे येथील लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांची प्रकृती मागील दोन दिवसात सुधारली होती. काल दुपारी त्यांना श्वासोश्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना श्वसन यंत्रणेचा आधार देण्यात आला होता. दरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी येताच सातारा पोलिसांवर दुःखाचा डोंगर कोसळला. वाई पोलीस ठाण्यावर शोककळा पसरली होती. ननावरे या आजारातून बरे व्हावेत यासाठी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपअधीक्षक अजित टिके, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी त्यांच्यावर चांगले उपचार करण्यासाठी व ते आजारातून बरे व्हावेत यासाठी फार प्रयत्न केले. आज दुपारी त्याच्या मृत्यूची बातमी कळाली व वाईत वातावरण सुन्न झाले. ननावरे हे मनमिळावू व धाडसी होते. त्यांनी सातारा मुख्यालय, मेढा, महाबळेश्वर, वाई आदी ठिकाणी सेवा बजावली होती. त्यांच्यावर पुण्यातच अंत्यसंस्कार करण्यात आले.