स्थैर्य, फलटण दि.16 : कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आला असला तरी अद्याप शहर व तालुक्यात कोरोना पूर्णतः संपलेला नसल्याने लॉकडाऊन शिथील काळात योग्य दक्षता, तसेच लॉकडाऊन शिथीलिकरण वेळ संपल्यानंतर बाहेर पडणार्यांविरुद्ध कडक कारवाई केली पाहिजे, तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क, सॅनिटायझर, सुरक्षीत अंतर याबाबी कटाक्षाने पाळल्या जातील यासाठी योग्य खबरदारी घ्या, न ऐकणार्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करा, असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण प्रशासनाला दिले.
लक्ष्मीविलास पॅलेस येथे आयोजित नियोजन व आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी आ. दिपकराव चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रांत पोटे, शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रावळ, बरड पोलीस दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे उपस्थित होते.
कोणत्याही गावात सापडलेला बाधीत व्यक्ती एकतर रुग्णालयात दाखल करा किंवा संस्थात्मक विलगीकरणात पाठवा परंतू आता कोणीही होम आयसोलेशन मध्ये (गृह विलगीकरणात) असणार नाही यासाठी विशेष खबरदारी घ्या, संस्थात्मक विलगीकरणात येण्यास कोणी नकार दिल्यास प्रसंगी पोलिसांची मदत घ्या पण कोणीही गृह विलगीकरणात ठेवू नका असे स्पष्ट निर्देश यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले.
200 बेडचे जम्बो कोविड हॉस्पिटल उभारण्याबाबत तातडीने निर्णय घेऊन कोणत्याही परिस्थितीत फलटणचे जम्बो कोरोना हॉस्पिटल आगामी 15/20 दिवसात उभे राहील असे नियोजन करा, सध्या ग्रामीण भागात सुरु करण्यात आलेली कोरोना केअर सेंटर्स, कोरोना उपचार केंद्र आज तेथे रुग्ण नाहीत म्हणून लगेच बंद करु नका, संभाव्य तिसर्या लाटेच्या शक्यतेचा विचार करता ही सर्व सेंटर्स बंद न करण्याचे निर्देश देतानाच खाजगी हॉस्पिटल्स मध्ये सुरु करण्यात आलेली कोरोना उपचार व्यवस्था, निर्माण करण्यात आलेली जादा बेड व अन्य व्यवस्था तशीच सुरु ठेवण्याबाबत संबंधीत खाजगी हॉस्पिटल्सना बैठक घेऊन संभाव्य तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर त्यांची सर्व यंत्रणा तशीच सुरु ठेवण्याबाबत त्यांनाही माहिती द्या असे निर्देश श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी बैठकीत दिले.
तिसर्या लाटेत लहान मुलांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे तज्ञ मंडळी सांगत असल्याने लहान मुलांसाठी स्वतंत्र यंत्रणा, तज्ञ डॉक्टर्स, उपचाराची साधने, सुविधा उपलब्ध करुन घेऊन लहान मुलांसाठी किमान 50 बेडचे स्वतंत्र हॉस्पिटल उभारण्याची आवश्यकता नमूद करीत त्याबाबत आराखडा तयार करण्याच्या सूचनाही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी बैठकीत दिल्या.
कोरोना लसीकरण ही मोठी समस्या आहे, लस उपलब्ध होण्यासाठी केंद्र शासन नियोजन करीत असल्याने राज्य शासन काहीच करु शकत नसल्याचे स्पष्ट करताना खाजगी करणातून 18 ते 44 वयोगटातील दुकानदार, बेकरी, दूध विक्रेते, भाजीपाला विक्रेते, सार्वजनिक व्यवस्थेतील वाहन चालक वगैरे विविध घटकातील लोकांचे लसीकरण करण्याचा प्रयत्न केला मात्र लस उपलब्ध होत नसल्याने सर्वांचीच कुचंबना होत असल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
प्रारंभी प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी तालुक्यातील आतापर्यंतचे एकूण बाधीत, त्यापैकी उपचार होऊन बरे झालेले आणि अद्याप उपचार सुरु असलेले रुग्णांची संख्या, लसीकरण सद्यस्थिती, सद्या शहर व तालुक्यात सुरु असलेले कोरोना टेस्टिंग व लसीकरण याबाबत सविस्तर माहिती दिली.