स्थैर्य, कातरखटाव, दि. ०९ : वडूज शहरात ७० वर्षीय पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. प्रशासनाने बाधितांच्या घर परिसरातील ३०० मीटर अंतराचा परिसर सुक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषीत केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी: शहरातील मुलाणवाडा, लोहारवाडा परिसरातील रहिवासी असलेल्या एका ७० वर्षीय वयोवृद्धाचा काही दिवसांपूर्वी कऱ्हाड येथील नातेवाईकांशी संपर्क आला होता. त्यानंतर मंगळवारी (ता. ७ ) त्यांना ताप, सर्दी, खोकला व धाप लागण्याचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी त्यांच्या घशातील स्त्रावाचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. बुधवारी (ता.८) सायंकाळी त्यांचा कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने नायब तहसीलदार सिताकांत शिर्के, उपविभागीय पोलीस अधीकारी बी.बी.महामुनी, गटविकास अधिकारी रमेश काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. युनूस शेख, नगराध्यक्ष सुनिल गोडसे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष मोरे, डॉ. वैशाली माने, पोलीस निरीक्षक अशोक पाटील यांनी भेट देत तीनशे मीटर अंतराचा परिसर सील केला.
बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कुटूंबातील दहा लोकांना मायणीच्या कोरोना हेल्थ सेंटरमध्ये विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. बाधित रूग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा स्वॅब ८ दिवसांनी घेतला जाणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दक्षतेचा उपाय म्हणून प्रशासनाने मुलाणवाडा, लोहारवाडा, धान्य बाजार, नगरपंचायत कार्यालय परिसर, तसेच मुख्य बाजार पेठेतून धान्य बाजाराकडे येणारे लहान रस्ते बंद केले. तसेच बाधित रूग्णाच्या वास्तव्याच्या ठिकाणापासून ३०० मीटर अंतराचा परिसर सुक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. शहरात प्रथमच स्थानिक कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने एकच खळबळ माजली आहे.