स्थैर्य,सातारा, दि.२१: जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये शुक्रवारी तीन बंदीवानांना कोरोना ची लागण झाली असल्याची माहिती समोर आली असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, गतवर्षी नंतर जेलमध्ये पुन्हा कोरोनाने इंट्री केल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, सातारा शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. सातारा जिल्हा कारागृह शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. जेल लगत सातारा शहर पोलीस ठाणे व पोलीस वसाहत देखील आहे. अशा गजबजलेल्या परिसरात जेल मध्ये तीन रुग्ण सापडल्याचे समोर आले आहे. तीन बंदीवानांची प्रकृती स्थिर असून शुक्रवारी दुपारी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, सातारा जेल मध्ये सुमारे दोनशे ते अडीचशे बंदिवान आहेत. याबरोबरच जेलमधील पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात असतात. गतवर्षी पुण्यातून आलेल्या बंदिवानमुळे जिल्हा कारागृहात कोरोनाची लागण झाली होती मात्र यंदा असा कोणताही बंदिवान कारागृहात न येताही कोरोनाचा शिरकाव झाल्याने कारागृह प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सिव्हिलमधील वैद्यकीय पथक सकाळ-संध्याकाळ बंदी वाहनांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करत आहेत. सध्या कारागृहात आणखी काय उपाय योजना केल्या आहेत का याची नेमकी परिस्थिती कशी आहे हे सांगण्यास मात्र अधिकार्यांनी नकार दिला.