दैनिक स्थैर्य । दि. १६ जुलै २०२१ । फलटण । तालुक्यात कोरोना संक्रमणाची दुसरी लाट मंदावल्याचे चित्र दिसत असून सद्यस्थितीत फलटण तालुक्यात 118 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. ही संख्या दिलासादायक असली तरी प्रशासनामध्ये तिसर्या लाटेची धास्ती व्यक्त होत आहे. यामुळेच अद्याप नियमांमध्ये शिथीलता देण्यात येत नसल्याने दुसरीकडे व्यावसायिक मात्र दिलास्याच्या प्रतिक्षेत शासनाच्या पुढील निर्देशांची वाट पाहत आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेने हाहाकार माजवला. त्यानंतर कोरोना बाधितांची संख्या घटल्यामुळे सुमारे अडीच – तीन महिन्याच्या कडक लॉकडाऊननंतर व्यापार्यांना आपली दुकाने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र ही संख्या पुन्हा वाढू लागल्याने अवघ्या पंधराच दिवसात जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने पुन्हा बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. हे निर्देश आजमितीसही लागू आहेत. तालुक्यातील कोरोना बाधितांची सद्यस्थिती बघितल्यास शासकीय व खाजगी हॉस्पिटल्स आणि कोरोना केअर सेंटरमध्ये 856 बेडची सुविधा उपलब्ध असून त्यापैकी केवळ 118 बेडवर रुग्ण दाखल असून 738 बेड उपलब्ध आहेत, त्यामध्ये 16 व्हेंटीलेटर सुविधेचे, 134 आयसीयू मधील, 161 ऑक्सिजन सुविधेचे आणि 427 जनरल बेड उपलब्ध आहेत. आयसीयू मध्ये 9, ऑक्सिजन सुविधेमध्ये 25, जनरल बेड वर 84 असे एकूण 118 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.
कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी दुसर्या लाटेचा अनुभव गाठीशी असल्याने संभाव्य तिसर्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज होत असून प्रशासनही कोणताही धोका पत्करण्याच्या मानसिकतेत नसल्याचे दिसत आहे. विशेषत: तालुक्यातील ग्रामीण भागावर प्रशासनाचे विशेष लक्ष असून रुग्णसंख्या वाढताच सदरची गावे प्रतिबंधित क्षेत्रे म्हणून घोषित करुन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न कसून सुरु आहेत. शिवाय शासनाच्या निर्देशानुसार संपूर्ण जिल्ह्यातील कोरोनाच्या आकडेवारीवर निर्बंध निश्चित होत असल्याने तालुक्यात जरी रुग्णसंख्या कमी असली तरी जिल्ह्याची परिस्थिती अद्याप सुधारत नसल्याने निर्बंध उठवले जात नसल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र एकीकडे संभाव्य रुग्ण संख्येचा विचार होत असताना दुसरीकडे लॉकडाऊनमुळे छोटे व्यवसाईक, हातगाडीवाले, रोजंदारी मजूर/कामगार आदी समाज घटकांवर ओढवणार्या परिस्थितीची नोंद घेऊन प्रशासनाने त्यांना दिलासा देण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. हे सर्व व्यापारी निर्बंध कमी होण्याच्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत आहेत.