
दैनिक स्थैर्य । दि.२३ जानेवारी २०२२ । सातारा । संपूर्ण जिल्ह्याचे करोना संक्रमणापासून संरक्षण करणारी जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणाच करोना संसर्गाच्या कचाट्यात सापडली आहे . जिल्हा शल्यचिकित्सकांसह जिल्हा रुग्णालयातील तब्बल १५ जणांचे अहवाल बाधित असल्याची माहिती समोर आली आहे .आरोग्य यंत्रणेतच करोनाचा फैलाव झाल्याने व्यवस्थाच हादरली आहे . प्रत्यक्ष रुग्णांवर उपचार करायचे कोणी ? असा प्रश्न उपस्थित झाला असून मनुष्यबळाअभावी यंत्रणेवर प्रचंड ताण पडला आहे .
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्यासह संपूर्ण कुटुंबाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून जिल्हा रुग्णालयातील अन्य दहा जणांनाही करोनाची बाधा झाल्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. डॉ. सुभाष चव्हाण आपल्या कुटुंबासमवेत आपल्या मूळ गावी पाली येथील घरी उपचार घेत आहेत.
सातारा जिल्ह्यामध्ये मार्च २०२० मध्ये करोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी जिल्हा रुग्णालयात करोनाबाधित व्यक्तींसाठी ऑक्सीजन बेड उपलब्ध करून देण्यासह अन्य सेवा सुविधा पुरविल्या होत्या. गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत त्यांनी सर्व प्रकारची खबरदारी घेऊनही काल करोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांनी तातडीने आपली रॅट करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली. त्यांच्या पाठोपाठ पत्नी, दोन मुले व कुटुंबातील अन्य एका सदस्याची चाचणी करण्यात आली. या सर्वांचेच रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्हा रुग्णालयात एकच खळबळ उडाली. डॉ. सुभाष चव्हाण यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांना करोना झाल्याचे लक्षात येताच त्यांच्या सहवासात आलेल्या जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी आपली रॅट चाचणी करून घेतली असता त्यापैकी १५ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांच्यावर आपापल्या घरी उपचार सुरू आहेत.
गेल्या अडीज वर्षातील उच्चांक
यापूर्वी जिल्हा रुग्णालयातील अनेक वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, सुरक्षा रक्षक व अन्य कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली होती. मात्र एकाच वेळी रुग्णालयातील वीस जणांचा अहवाल पॉझिटिव्ह येण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या अडीच वर्षातील जिल्हा रुग्णालयातील हा उच्चांक समजला जातो.