स्थैर्य, मुंबई, दि.०२: मागील आठवड्याच्या शर्यतीनंतर बाजाराने काहीसा विराम घेतल्याचे दिसत आहे. एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की, मे महिन्यात बाजार उच्चांकी स्थितीत होता, तर आशियाई आणि अमेरिकी बाजाराने फ्लॅट स्थितीत व्यापार दर्शवल्याने जून महिन्यात बाजाराचे स्वागत फ्लॅट स्थितीतच झाले. निफ्टीनेही आज फारसा चढ-उतार न घेता दिवसाची सुरुवात केली. दिवसभरातील व्यापारी सत्रात अस्थिरता दर्शवली. मार्केट ट्रिगर्सच्या अभावामुळे ट्रेडर्स माघारी फिरले. इंडिया व्हीआयएक्सनेही गती दर्शवली. ३ दिवसांच्या कुल-ऑफनंतर यात सुधारणा दिसून आली. निफ्टी ७ दिवसांच्या सकारात्मक गतीनंतर आज इंट्राडेमध्ये १०० अंकांनी घसरला आणि दिवसाअखेर काहीशा कमी स्थितीत विसावला.
ब्रॉडर मार्केटमधील हालचाली : ब्रॉडर मार्केट्स, मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनी घट दर्शवली. यात आयटी, मीडिया आणि फार्मा सेक्टर वगळता सर्व सेक्टरल निर्देशांकांनी लाल रंगात विश्रांती घेतली. त्यापैकी प्रायव्हेट बँक इंडेक्सला सर्वाधिक तोटा झाला. तर स्टॉकच्या पातळीवर, निफ्टी ५0 पैकी, अदानी पोर्ट्स, ओएनजीसी, आयसीआयसीआय बँक हे टॉप लूझर्स ठरले.
आजच्या बातम्यांतील स्टॉक्स: आजच्या बातम्यांमधील स्टॉक्स ऑटो आणि मेटल सेक्टरचे होते. मेटल सेक्टरपासून सुरुवात करता, ब्रोकरेज फर्मनी डाउनग्रेड केल्याने तेे दबावाखाली आले. तर दुसरीकडे ऑटो सेक्टर कंपन्या त्यांचा मासिक विक्री डेटा जाहीर करणार आहेत. अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायजेसच्या शेअर्सने १४३० रुपये प्रति शेअरचा विक्रम नोंदवला. मंगळवारच्या इंट्रा-डे सत्रात स्टॉकने ७ टक्क्यांपेक्षा जास्त वृद्धी दर्शवली. तर पीएसयू बँकिंगमधील प्रमुख, स्टेट बँकेने ५२ आठवड्यांतील उच्चांक गाठला. हा स्टॉक मागील ५२ आठवड्यांत १६०% (मे २०२० ते मे २०२१चा कालावधी) वाढला. या वर्षापर्यंतचा नफा जवळपास ५५%झाला. बजाज ऑटोचे शेअर्सही सकाळच्या सत्रात २% वाढले. कंपनीने मे महिन्यात मजबूत विक्री दर्शवल्याने हे परिणाम दिसून आले.
देशांतर्गत आर्थिक आकडेवारी: देशांतर्गत आघाडीवर, भारतातील मॅन्युफॅक्चरिंग पीएमआयने मागील महिन्यातील ५५.५ वरून मे महिन्यात ५०.८ एवढी दहा महिन्यांतील सर्वाधिक घट दर्शवली. देशातील कोव्हिड- १९ च्या रुग्णांची वाढ आणि अर्थव्यवस्थेवरील त्याचा प्रभाव यामुळे हे परिणाम दिसून आले.
जागतिक आकडेवारीतील चढ-उतार: जागतिक पातळीवर, अमेरिकी मार्केटने दीर्घ विकेंडनंतर ट्रेडिंगला सुरुवात केली. तर युरोपियन बाजारातही (DAX and CAC ४०) मंगळवारी नवे उच्चांक दर्शवले. युरो झोन मॅन्युफॅक्चरिंग अॅक्टिव्हिटी डेटा एप्रिल महिन्यातील ६२.९०वरून मे महिन्यातील ६३.१ पातळीवर गतीने पोहोचला.
अखेरीस, प्रायव्हेट बँक आणि मेटल धातूंनी निर्देशांकाला खाली खेचल्याने दिवस संपताना निफ्टीने ७ अंकांनी घट दर्शवत १५,५७४ अंकांवर विश्रांती घेतली. तसेच आगामी काळात निफ्टीच्या लेव्हल्स पाहता, त्याचा सपोर्ट १५,४५०वर तर रेझिस्टन्स १५,७००- १५,७५०पातळीवर राहिल.